'गांधी' विरूद्ध 'गांधी'!

पु्ण्यातल्या गांधी स्मारक निधीच्या जमिनीच्या गैरव्यवहाराचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय. महत्त्वाचं म्हणजे 'आजचे गांधी' म्हणवले जाणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या संस्थेचे तत्कालीन विश्वस्त असल्याने त्यांचंही नाव यात जोडलं जातंय.

Updated: Dec 16, 2011, 11:19 AM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

 

पु्ण्यातल्या गांधी स्मारक निधीच्या जमिनीच्या गैरव्यवहाराचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय. महत्त्वाचं म्हणजे 'आजचे गांधी' म्हणवले जाणारे  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या संस्थेचे तत्कालीन विश्वस्त असल्याने त्यांचंही नाव यात जोडलं जातंय.  मात्र सध्याचे अध्यक्ष कुमार सत्पर्षी यांनी अण्णांचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय.

 

भ्रष्टाचाराविरोधात लढा पुकारणारे अण्णा नव्या वादात ओढले जाण्याची शक्यता आहे. कधी काळी अण्णा विश्वस्त असलेल्या पुण्यातल्या गांधी स्मारक समितीच्या जमीन गैरव्यवहारप्रकरणी वाद निर्माण झालाय. महात्मा गांधीच्या कार्याचा आणि विचारांचा प्रसार करण्यासाठी दिल्लीत गांधी स्मारक समितीची स्थापना करण्यात आली. त्याअंतर्गत पुण्यात महाराष्ट्र 'गांधी स्मारक समिती'ची स्थापना झाली.

मात्र पुण्यातली ही गांधी स्मारक समिती जमिनीच्या गैरव्यवहारावरून वादात सापडली आहे. समितीकडे असलेल्या कोथरूड परिसरातल्या साडेदहा एकर जमिनीपैकी एक एकर जमिन समितीनं १९९९मध्ये रोहन बिल्डरला विकली. या व्यवहारातून महाराष्ट्र गांधी स्मारक समितीला एक कोटी २० लाख रुपये मिळाले. मात्र दिल्लीच्या गांधी स्मारक समितीनं व्यवहाराविरोधात पुणे कोर्टात याचिका दाखल केली.

 

कोर्टानं महाराष्ट्र समितीचा हा व्यवहार अवैध ठरवला.  तर हायकोर्टानं पुणे कोर्टाचा निकाल रद्दबातल ठरवला. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. मात्र या प्रकरणात महाराष्ट्र गांधी स्मारक समितीचे तत्कालीन विश्वस्त  असलेल्या अण्णा हजारेंनाही प्रतिवादी करण्यात आलं. त्यामुळं या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय. मात्र संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. कुमार सत्पर्षी यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत.

 

जमीन व्यवहाराचं हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र  भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकलेल्या अण्णांचंही नाव या वादात आल्यानं हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय. आता अण्णा या वादावर काय प्रतिक्रिया देतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.