मी महायुतीतच राहणार- आठवले

राज्यसभा उमेदवारी नाकारल्यानंतर, नाराज असलेले रामदास आठवले सध्यातरी महायुतीतच राहणार आहेत. लोणावळ्यात आरपीआयच्या अधिवेशनात त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे.

Updated: Apr 3, 2012, 09:23 PM IST

www.24taas.com, लोणावळा  

 

राज्यसभा उमेदवारी नाकारल्यानंतर, नाराज असलेले रामदास आठवले सध्यातरी महायुतीतच राहणार आहेत. लोणावळ्यात आरपीआयच्या अधिवेशनात त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी उपस्थित असलेल्या शिवसेना-भाजप नेत्यांनीही आठवलेंना न्याय देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

 

लोणावळ्यातल्या RPI च्या शिबिरात युतीचे नेते हजर असल्याने, मात्र रामदास आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी मिळाली नसल्यानं ते नाराज होते. त्याचा परिणाम महायुतीवर होऊन आठवले काय बोलणार याची उत्सुकता होती. मात्र २०१४ सालची विधानसभा निवडणूक जिंकायची असेल, तर महायुती तोडून चालणार नाही, असं आठवले यांनी जाहीर करत महायुती कायम ठेवली आहे.

 

महायुती भक्कम असल्याचा दावा युतीच्या नेत्यांनी करत रामदास आठवलेंना मानाचे स्थान दिलं जाईल असं जाहीर करत नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला. आरपीआयचं हे शिबीर निवडणुकांमध्ये झालेल्या अपयशाचं चिंतन करण्यासाठी होतं, मात्र सर्वांचंच लक्ष लागलं होतं ते आठवलेंच्या भूमिकेकडं.. पण तूर्तास तरी अनिच्छेनं का होईना, महायुती कायम राहणार असल्याचं स्पष्ट झाल आहे.