विठ्ठलमूर्तीला आता नाही वज्रलेप

Updated: Jan 17, 2012, 08:10 PM IST

www.24taas.com, पंढरपूर

 

पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या वज्रलेपनाची प्रक्रिया तूर्तास रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विठ्ठलाचं दर्शन आणि पूजा उद्यापासून सुरू होणार आहे. विठ्ठलाच्या मूर्तीवर होणारा अभिषेक आणि पूजेमुळे मूर्तीची झीज होत होती. त्यासाठी इपॉक्सी तंत्रज्ञानानं मूर्तीवर वज्रलेपनाची प्रक्रिया करण्यात येणार होती. त्यासाठी मंदिरही बंद ठेवण्यात येणार होतं. मात्र विठ्ठलाच्या मूर्तीवर इपॉक्सी तंत्रज्ञानानं वज्रलेपन करायला वारकरी संघटनांबरोबर संभाजी ब्रिगेडनंही विरोध केला होता.

 

इपॉक्सी तंत्रज्ञानानं वज्रलेपन करण्याची पद्धत चुकीची असल्याचं या संघटनांचं म्हणणं आहे. इपॉक्सी तंत्रज्ञानाऐवजी पुरातत्व खात्याकडून वज्रलेपन करण्यात यावं, अशी मागणी करण्यात येत होती. इपॉक्सी वज्रलेपनाचा निर्णय मागे घेतला नाही, तर उद्यापासून बंदचा इशाराही देण्यात आला होता. हा वाद चिघळल्यानंतर वज्रलेपनाचा निर्णय तूर्तास रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भातली डॉक्टर देगलूरकर समितीही बरखास्त करण्यात आली आहे. वीस तारखेला पुरातत्व खात्याची बैठक होतेय, त्यानंतर वज्रलेपनाचा निर्णय घेण्यात येणार आहे.

[jwplayer mediaid="30827"]

विठ्ठल मूर्तीच्या वज्रलेपावरुन बोलावलेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे बैठक थांबवण्यात आली. मंदिर प्रशासन, वज्रलेप करणारी समिती आणि आंदोलनकर्ते यांची बैठक बोलावण्यात आली होती. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मुर्तीचा पदस्पर्श, दर्शन आणि महापुजा या कारणांमुळे पंढरपुरच्या विठ्ठल मुर्तीची होणारी झीज रोखण्यासाठी मंदिर समितीने मुर्तीवर वज्रलेपनाचा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीच्या या निर्णयाला विठ्ठलभक्तांनी विरोध दर्शवला आहे.

 

इपॉक्सी नावाच्या रासायनिक प्रकियेद्वारे करण्यात येणारी ही वज्रलेपनाची पद्धतच चुकीची असल्याचं वारकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं याला विरोध दर्शवत वारकऱ्यांनी विठ्ठल मंदिरासमोर  ठिय़्या आंदोलन पुकारलं आहे. वारकरी, दिंडीकरी, फडकऱ्यांनी हे आंदोलन केलं आहे. पुरातत्व खात्याकडून मूर्तीला वज्रलेप करावा, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे.