www.24taas.com, जत
सांगली जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त जनतेच्या अनेक समस्यांचे भीषण वास्तव्य आत्ता समोर येत आहे.' जत ' तालुक्यातील ' करेवाडी ' गावातील लोक मागील बारा वर्षापासून रेशनकार्डच्या प्रतीक्षेत आहेत. गावातील ऐंशी टक्के लोकांना रेशनकार्डच देण्यात आली नाहीत. वेळोवेळी मागणी करूनही येथील दुष्काळ ग्रस्तांची पाणी आणि चाऱ्या बरोबरच आत्ता अन्न धान्यासाठी परवड सुरु आहे.
महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर असणारे ' जत ' तालुक्यातील करेवाडी ( कोन्त्या बोबलाद ) हे तीन हजार लोक वस्तीवरचे गाव आहे. ह्या गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा फटका बसत आहे. पिण्याचे पाणी आणि चाऱ्या अभावी येथील लोकांचे आणि जनावरांचे मोठे हाल होत आहेत. ट्यान्कर नुसते कागदावर असून, चार-चार दिवस येथील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. चाऱ्या बाबत अशीच परिस्थिती आहे. तर ग्रामसेवक आणि तलाठी गावातच येत नसल्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे.
जतचे आमदार प्रकाश शेंडगे हे दुष्काळग्रस्त करेवाडी गावचा दौरा करीत असताना,या गावातील धक्कादायक माहिती समोर आली. करेवाडी गावातील लोक मागील बारा वर्षा पासून, रेशनकार्ड मिळण्यासाठी संघर्ष करीत आहेत. गावातील सत्तर ते ऐंशी टक्के लोकांच्याकडे रेशनकार्ड नाहीत.त्यामुळे त्यांना धान्य आणि रॉकेल मिळत नाही.रेशनकार्ड नसल्यामुळे,प्रत्येक ठिकाणी ग्रामस्ताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
करेवाडी गावाची लोकसंख्या तीन हजार असून, येथे जवळपास नऊशे कुटुंब राहतात, मात्र या गावातील केवळ शंभर लोकांकडेच रेशनकार्ड आहेत.शिवाय ज्या मोजक्या लोककडे रेशनकार्ड आहे. त्याना ही धान्य आणि रॉकेल व्यवस्थित मिळत नाही. मागील अनेक वर्ष्यापासून मागणी करूनही लोकांना पुरवठा विभागा कडून रेशनकार्ड मिळत नाहीत, असे कबूल करीत येथील रॉकेल वितरक हे धान्य आणि रोकेल व्यवस्थित वितरीत होते असा दावा करीत आहेत.