हवी उमेदवारी, तर नको 'पिचकारी'!

कोल्हापुरात तरूण पिढीसमोर चांगला आदर्श घडविण्यासाठी निर्व्यसनी असणाऱ्यांनाच निवडणुकीचं तिकीट दिलं जाणार आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी तंबाखूचं सेवन असणाऱ्यांनाही तिकीट नाकारलंय.

Updated: Nov 23, 2011, 07:57 AM IST

झी २४ तास वेब टीम, कोल्हापूर

 

मनसेनं परीक्षा घेऊन उमेदवारांना तिकीट देण्याचा घेतलेला निर्णय सध्या गाजतोय. आता त्याच धर्तीवर काँग्रेसनंही कोल्हापुरात निर्व्यसनी तरूणांना निवडणुकीचं तिकीट देण्याचा निर्णय घेतलाय. राजकारणात निर्व्यसनी तरूणांना संधी देऊन समाजात चांगला संदेश देण्यासाठी ही कृती महत्वाची ठरणारी असल्याचा त्यांचा दावा आहे.

 

मनसेनं महापालिका निवडणुकांसाठी परीक्षेत पास होण्याची अट ठेवलीय. निवडणुकीसाठी उभं राहण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना महापालिकेच्या कार्यपद्धतीची कितपत माहिती आहे,  हे यातून जाणून घेण्याचा मनसेचा उद्देश आहे. त्याच धर्तीवर आता कोल्हापुरातही नवा ट्रेण्ड पहायला मिळणार आहे. निवडणुका जिंकण्यासाठी 'रस्सा मंडळे' आणि पार्ट्यांचं आयोजन करणाऱ्या नेत्यांमुळं तरूण पिढी व्यसनाधीन होत चाललीय. मात्र आता तरूण पिढीसमोर चांगला आदर्श घडविण्यासाठी निर्व्यसनी असणाऱ्यांनाच निवडणुकीचं तिकीट दिलं जाणार आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी तंबाखूचं सेवन असणाऱ्यांनाही तिकीट नाकारलंय. सध्या कोल्हापूर जिल्ह्या पुरता मर्यादीत असणारा हा निर्णय राज्यासाठीही तितकाच महत्वाचा ठरणारा आहे.

 

राज्यमंत्र्यांच्या निर्व्यसनी उमेदवारांना तिकीट देण्याच्या निर्णयाचं कार्यकर्त्यांनी स्वागत केलंय. निर्व्यसनी उमेदवारामुळं तरूण पिढीत चांगला संदेश जाईल. तसंच निवडणुकांच्या काळात व्यसनाधीनतेला मिळणारं खतपाणी या माध्यातून रोखणं शक्य होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. 'यथा राजा तथा प्रजा' या उक्तीप्रमाणं नेते निर्व्यसनी असतील तर कार्यकर्तेही त्यांचंच अनुकरण करतील. परिणामी कोल्हापुरातला हा पॅटर्न राज्यातही लागू करण्याची तितकंच महत्वाचं आहे.