लातूरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ठाकरे कुटुंबावर शरसंधान साधलं, ते सिध्दी साखर कारखान्याच्या उदघाटना प्रसंगी बोलत होते. ठाकरे कुटुंबाला उद्देशून बोलताना ते म्हणाले की तुमच्या बापजाद्यांनी कधी शेती केली आहे का? शेती करणं आम्हाला शिकवू नका. आम्ही पिढीजात शेतीच करत आलो आहोत आणि ती आम्हाला चांगल्या प्रकारे करता येते असा सज्जड दमच पवारांनी भरला.
गेल्या काही दिवसांमध्ये ऊस आणि कापसाला भाव मिळावा यासाठी राज्यभरात तीव्र आंदोलनं सुरु आहेत. राज ठाकरेंच्या मनसेने राजू शेट्टींच्या उसाला भाव मिळावा यासाठीच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला होता. तसंच शिवसेनेनेही या आंदोलनामध्ये उडी घेतली आहे. तसंच राज्यभरात नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांमुळे वातावरण तापलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यात सातत्याने संघर्ष होताना दिसत आहे. अजित पवारांनी परत एकदा तुफानी हल्ला चढवून राजकीय संघर्ष धारदार केला आहे.