युनायटेड किंग्डममध्ये मागील वर्षात अनेक घटस्फोटांचे प्रमुख कारण फेसबूक असल्याचं नमुद करण्यात आलं आहे. गेल्या वर्षभरातील एक तृतियांश घटस्फोट फेसबूकमुळे झाले असं सांगण्यात येत आहे. तसंच घटस्फोटांच्या खटल्यांमध्ये फेसबूकचा पुरावा म्हणून उपयोग करण्यात येत आहे. डायवोर्स ऑनलाई या वकिली फर्मने म्हटलं आहे की वागणुकीच्या आधारावर दाखल करण्यात आलेल्या घटस्फोटांच्या ५००० याचिकांमध्ये ३३ टक्के याचिकाकर्त्यांनी फेसबूकचा उल्लेख केला आहे.
खरतरं आपल्या मित्रमंडळीशी संवाद साधण्याचे माध्यम म्हणून फेसबूकचा उपयोग करण्यात येतो. पण लोकं आपल्या पूर्वीच्या जोडीदारांशी संपर्क साधतात आणि साध्यासुध्या संभाषणाची परिणीती नंतर त्रासात होते. एकादयाला अफेअर किंवा फ्लर्ट करायचं असेल तर फेसबूक सारखं माध्यम नाही. फेसबूकमुळे पती किंवा पत्नीने पाठवलेल्या मेसेज किंवा एकाद्या पार्टीतले फोटोमुळे संशयाचं भूत मानगुटीवर बसतं. आणि तुम्ही जर एकादी गोष्ट आपल्या जोडीदारापासून लपवून ठेवत असाल तर फेसबूकमुळे ते शोधणं सहज सोपं होतं. पती किंवा पत्नीने तुमच्या दारु पिण्याच्या सवयीबद्दल याचिकेत तक्रार दाखल केली असल्यास फेसबूकवरच्या अपडेट किंवा स्टेटस अडचणीत आणू शकतात. तसंच वर्तणुकीच्या बाबतीत देखील फेसबूकचा पुरावा म्हणून वापर केला जाऊ येतो.