भारतात २०१४ पर्यंत नेटचा वापर करणाऱ्यांची संख्या ३०० दशलक्षांवर जाऊन पोहचेल अशी गुगलचा अंदाज आहे. सध्या भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या १०० दशलक्ष आहे त्यात तिप्पट वाढ होणं अपेक्षित असल्याचं गुगलचे कंट्री हेड राजन आनंदन यांनी द वॉल स्ट्रीट जर्नलला सांगितलं. भारतात एकूण लोकसंख्येपैकी फक्त आठ टक्केच लोकं ऑनलाईन सेवेचा लाभ घेतात.
भारतात जगातील तिसऱ्या क्रमांकाची इंटरनेटची बाजारपेठ आहे. चीन आणि अमेरिका भारताच्या पुढे आहेत. आनंदन यांच्या मते सध्या भारतीय टेलिकॉम कंपन्या हाय स्पीड वायरलेस नेटवर्कची उभारणी करताहेत त्याचा वापर हे नवे २०० दशलक्ष ग्राहक करतील. इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येतील वाढीमुळे देशातील इ-कॉमर्स म्हणजेच इंटरनेटवरील व्यापार आणि उद्योगाच्या उलाढालीला मोठी चालना मिळेल असं निरीक्षण वॉल स्ट्रीटने नोंदवलं आहे.