कोण म्हणतं आमचं वय झालेय???

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नुकतेच बांगलादेशमध्ये आपल्या महासेंच्युरीला गवसणी घालत सेंच्युरीचा एव्हरेस्ट उभारला. तर रॉजर फेडररने इंडियन वेल्स टूर्नामेंट जिंकत फ्रेन्च ओपनकरता तयारी झाल्याचाच जणुकाही इशारा दिला आहे.

Updated: Mar 22, 2012, 10:08 AM IST

www.24taas.com, मेघा कुचिक, मुंबई

 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नुकतेच बांगलादेशमध्ये आपल्या महासेंच्युरीला गवसणी घालत सेंच्युरीचा एव्हरेस्ट उभारला. तर दुसरीकडे टेनिस किंग अशी ओळख असणाऱ्या रॉजर फेडररने इंडियन वेल्स टूर्नामेंट जिंकत फ्रेन्च ओपनकरता तयारी झाल्याचाच जणुकाही इशारा दिला आहे. आपापल्या क्षेत्रात विक्रमांचे इमले उभारणाऱ्या या दोघांचाही वयाच्या तिशीतही दरारा कायम आहे.

 

मनात दृढनिश्चिय असेल तर प्लेअरच्या कामगिरीवर वाढत्या वयाचादेखील परिणाम होत नाही. याच उत्तम उदाहरण म्हणजे क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडुलकर आणि टेनिसचा सम्राट रॉजर फेडररने. वयाची तिशीनंतरही हे दोघांच्या कामगिरीत तसूभरही फरक पडल्याचं दिसत नाही. आपापल्या खेळात यशाचे एव्हरेस्ट गाठल्यानंतरही त्यांची गगनभरारी घेण्याची जिगर अजूनही कायम आहे.

 

करियरच्या अंतिम टप्प्यात असतानाही सचिन आणि फेडरर यांची विजयाची आणि रेकॉर्ड ब्रेक कामगिरी सुरूच आहे.वयाच्या ३८ व्या वर्षी सचिनने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सेंच्युरींची सेंच्युरी झळकावण्याची किमया केली. टेस्ट आणि वन-डेमध्ये सर्वाधिक रन्सदेखील सचिनच्याच नावावर आहेत. टेस्टमध्ये १५ हजार ४७० रन्स तर वन-डेमध्ये १८ हजार ४२६ रन्स केल्या आहेत. तर स्विर्झलंडचा टेनिसपटू रॉजर फेडररने नुकतच इंडियन वेल्सच विजेतेपद पटकावला आहे.

 

यंदाच्या सीझनमध्ये त्याने सलग १५ विजेतेपद पटकावली आहेत. फेडररच्या नावावर विक्रमी १६ ग्रँड स्लॅम विजेतेपद आहेत. वयाची चाळीशी जवळ आली असतानाही सचिनचे रनिंग बिटविन दी विकेट युवा प्लेअर्सना लाजवण्यासारखे आहे. तर फिटनेस हा महत्त्वाचा घटक असलेल्या टेनिसमध्ये फेडरर अजूनही विजय खेचून आणत आहे. यामुळेच दृढनिश्चिय आणि अविश्रांत परिश्रम करण्याची दुर्देम्य इच्छाशक्ती असेल तर खेळामध्ये वय हादेखील अडसर ठरत नाही हे मास्टर-ब्लास्टर आणि फेडी हे आपल्या विजयातून दाखवून देत आहेत.