फेडरर सातव्यांदा विम्बल्डन विजेता

विजेतेपदासह फेडेक्सनं तब्बल सातवेळा विम्बल्डन विजेतेपद पटकावण्याची किमया साधली आहे. त्यानं सात वेळा विम्बल्डन विजेतेपद जिंकणा-या पीट सॅम्प्रसच्या विजेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरीही केली.

Updated: Jul 9, 2012, 08:07 AM IST

www.24taas.com, लंडन

 

विजेतेपदासह फेडेक्सनं तब्बल सातवेळा विम्बल्डन विजेतेपद पटकावण्याची किमया साधली आहे. त्यानं सात वेळा विम्बल्डन विजेतेपद जिंकणा-या पीट सॅम्प्रसच्या विजेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरीही केली. त्याचप्रमाणे त्यानं आपल्या टेनिस करिअरमधील तब्बल 17 वं ग्रमडस्लॅम जिंकलं आहे.

 

गेल्या अडीच वर्षांपासून ज्या क्षणाची रॉजर फेडरर आणि त्याचे जगभरातील चाहते वाट बघत होते अखेर तो क्षण तमाम टेनिसप्रेमींना अनुभवायला मिळाला. फेडररनं ब्रिटनच्या अँडी मरेला पराभूत करत विम्बल्डन अजिंक्यपदावर तब्बल सातव्यांदा आपलं नाव कोरलं. या विजयानंतर सेंटर कोर्टवरील टेनिसप्रेमी फेडेक्सच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक कराव की, मरेच्या पराभवामुळे हळहळ व्यक्त करावी या द्विधा मनःस्थितीत होते.

 

एकीकडे फेडररला आपल्या विजयाचे आनंदाश्रू रोखता येत नव्हते तर दुसरीकडे मरेला आपल्या पराभवचं दु:खही लपवता येत नव्हतं. दोन्ही टेनिसपटूंसाठी ही ऐतिहासिक फायनल होती. मात्र, फेडेक्सनं यामध्ये बाजी मारली आणि इतिहासाची नोंद केली. यावेळी त्याला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या त्याच्या दोन जुळ्या मुलीही फेडेक्सच्या विजयोत्सवात सहभागी झाल्या होत्या. तब्बल अडीच वर्षानंतर ग्रँडस्लॅम जिंकल्याचा आनंद फेडेक्सच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. फेडरर आणि मरे या दोन्ही टेनिसपटूंनी बहारदार खेळ केला. आणि यामुळेच  सेंटर कोर्टवरील टेनिसप्रेमींना रंगतदार मॅच पाहायला मिळाली.

 

मरेनं पहिला सेट जिंकल्यानंतर तो ब्रिटनचा 76 वर्षांचा विम्बल्डन जिंकण्याचा दुष्काळ संपवेल अशी अपेक्षा होती. मात्र, लढवय्या फेडेक्सनं दुस-या सेटमध्ये कमबॅक केलं. आणि तिथेच मरेचं पहिलं-वहिलं ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंग होयला सुरुवात झाली. मरेनं दुसरा सेट जिंकला असता तर मॅचचं चित्र कदाचित वेगळ पहायला मिळालं   असतं.  मात्र, फेडररनं आपल्या खेळानं विम्बल्डनचे आपणच अनभिषिक्त सम्राट असल्याचं दाखवून दिलं. या अजिंक्यपदामुळे फेडेक्स पुन्हा एकदा अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. नादाल आणि जोकोविचनं खालासा केलेल्या साम्राज्याचा तो पुन्हा एकदा सम्राट बनला आहे. त्यामुळेच फेडरर जैसा कोई नही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही....