www.24taas.com, मुंबई
भारतीय क्रीडाविश्वात महिला मागे नाहीत. सायना आणि सानिया यांनीतर भारतीय क्रीडाक्षेत्रात आणि क्रीडा विश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.मात्र तत्पूर्वी ऍथलेटिक्समध्ये पीटी उषा,वेटलिफ्टिंगमध्ये करणम मल्लेश्वरी आणि बॉक्सिंगमध्ये मेरीकोमनं भारताची शान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली.
भारतीय क्रीडा विश्वाचा इतिहास पाहिला तर फारच कमी महिलांनी आपल्या कामगिरीनं जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र आता परिस्थितीत सुधारणा झाली आहे. बॅटमिंटनपटू सायना नेहवाल आणि टेनिसपटू सानिया मिर्झाच्या झंझावती कामगिरीनं एक वेगळंच वलय निर्माण केलं. सायनानं तर वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकापर्यंत झेप घेतली. सायनानं भारतीयांना ऑलिंपिकमध्ये मेडल्सचं स्वप्न दाखवलं. सानिया मिर्झाची कामगिरी फारशी बहरली नाही. पण तिच्या ग्लॅमरनं प्रथमच भारतीय क्रीडा विश्वात एक ब्रँड निश्चितच निर्माण केला.
क्रीडा क्षेत्रातील भारतीय महिलांची चर्चा करत असताना पायोल्ली एक्सप्रेसला विसरून चालणार नाही. पीटी उषानं आपल्या भन्नाट कामगिरीनं सर्वांनाच अवाक् केलं होतं. सेऊल एशियन गेम्समध्ये तिच्या वेगानं सर्वांचाच लक्षं वेधून घेतलं. तिच्या अफलातून कामगिरीनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र लॉस एन्जलिस ऑलिंपिकमध्ये तिचं मेडल थोडक्यात हुकलं. उषानंतर केवळ अंजू बॉबी जॉर्ज लाँग जंपमध्ये जागतिक मैदानी स्पर्धेत चमकदार कामगिरी करू शकली. तर बॉक्सिंमध्येही मेरी कोमनंही आपल्या अचाट कामगिरीनं जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला. मेरी सलग पाचवेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरली.
करणम मल्लेश्वरीचं नाव भारताच्या क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहलं जाईल.भारताला ऑलिंपिकमध्ये मेडल मिळवून देणारी ती एकमेव महिला. सिडनी ऑलिंपिकमध्ये तिनं वेटलिफ्टिंगमध्ये मिळवलेल्या ब्रॉन्झ मेडलनं भारताची इभ्रत वाचवली होती. भारताच्या रणरागिणींनी आपल्या कामगिरीच्या जोरावर खेळाच्या मैदानतही ‘हम भी किसी से कम नही’ हेच दाखवून दिलं.