हॉकी खेळाडूंवर बक्षिसाचा वर्षाव

भारतीय हॉकी संघातील खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला सहारा इंडिया परिवाराने १ कोटी २७ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.

Updated: Mar 1, 2012, 03:11 PM IST

www.24taas.com,   नवी दिल्ली

 

 

लंडन ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकिट निश्चित करणाऱ्या भारतीय हॉकी संघातील खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला सहारा इंडिया परिवाराने १ कोटी २७ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

 

 

ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत फ्रान्सवर ८-१ असा दणदणीत विजय मिळविल्याने भारतीय हॉकी संघाचा मुख्य पुरस्कर्ता असलेल्या सहाराने हॉकी संघाला हे बक्षिस देण्याचे ठरवले आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावणारा सरदारा सिंग आणि अंतिम फेरीत हॅट्ट्रिकसह पाच गोल करणाऱ्या संदीप सिंग यांना प्रत्येकी ११ लाख रुपये देण्यात येणार आहे. तर  प्रशिक्षक मायकेल नॉब्ज यांना पाच लाख  आणि सहयोगी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात येतील.

 

 

सहारा समूहातर्फेच सर्व कर भरण्यात येणार असल्यामुळे खेळाडूंना मिळणार असलेले पैसे करमुक्त असेल. ‘भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीवर आम्ही समाधानी आहोत. हॉकी हा राष्ट्रीय खेळ असून त्याच्याशी निगडीत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भविष्यात चांगली कामगिरी करण्यासाठी आम्ही त्यांना हे  बक्षिस  देण्याचे ठरवले आहे,  असे सहारा परिवाराचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांनी सांगितले.