गंभीरने धोनीला दाखवून दिलं..

कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमनं आयपीएलच्या पाचव्या सीझनवर आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सीझनमध्ये गौतम गंभीरची कॅप्टन्सी भलतीच यशस्वी ठरली. त्याची रणनिती फाय़नलमध्येही अनुभवी महेंद्रसिंग धोनीच्या डावपेचांपेक्षा सरस ठरली.

Updated: May 28, 2012, 06:16 PM IST

www.24taas.com, बंगळूरू

 

कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमनं आयपीएलच्या पाचव्या सीझनवर आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सीझनमध्ये गौतम गंभीरची कॅप्टन्सी भलतीच यशस्वी ठरली. त्याची रणनिती फाय़नलमध्येही अनुभवी महेंद्रसिंग धोनीच्या डावपेचांपेक्षा सरस ठरली. त्याच्या धुर्त नेतृत्वामुळेच कोलकाताला आयपीएलच्या पाचव्या सीझनचं अजिंक्यपद पटकावण्यात यश आलं.

 

कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलच्या पाचव्या सीझनची चॅम्पियन टीम ठरेल असं सीझनच्या सुरुवातीला कोणलाच वाटल नाही. मात्र, या टीमनं एकामागून एक विजय मिळवत फायनल गाठली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.  फायनलमध्ये तर या टीमनं १९० रन्सचं अशक्यप्राय टार्गेट सहज पार केलं. गौतम गंभीरच्या टीमनं पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश केला होता. आणि आपल्या पहिल्याच फायनलमध्ये त्यांनी विजेतेपदावर कब्जाही केला.

 

या विजयामध्ये प्रत्येक क्रिकेटपटूचा वाटा मोठा होता. मात्र, गौतम गंभीरच्या शानदार नेतृत्वाचं कौतुक करावं तेवढं थोड आहे. त्याच्या धुर्त नेतृत्वामुळेच कोलकाता या सीझनची चॅम्पियन टीम ठरली. धडाकेबाज ओपनिंग बॅट्समन, मोक्याच्या क्षणी क्लिक होणारी मिडल ऑर्डर, आणि फटकेबाजी करणारी लोअर मिडल ऑर्डर त्याच्या टीममध्ये होती. तर ३ उत्कृष्ट स्पिनर्स आणि जबरदस्त फास्ट बॉलर्स असं कुठल्याही कॅप्टनला हवं असणारं टीम कॉम्बिनेशन त्याच्याकडे होतं.

 

त्यानं आपल्या क्रिकेटपटूंचा योग्य प्रकारे वापर केला. ज्या-ज्या क्रिकेटपटूंवर त्यानं विश्वास ठेवला त्या क्रिकेटपटूंनी त्याचा विश्वास सार्थही ठरवला. फायनलमध्ये त्यानं फॉर्मातल्या ब्रेंडन मॅककलमला टीम बाहेर ठेवत लोकल बॉय मनविंदर बिसलाला संधी दिली. बिसलानं शानदार इनिंग खेळली आणि आपल्या टीमला आयपीएलचं पहिलं-वहिलं अजिंक्यपद पटकावून दिलं. फिल्डिंग करतांनाही आपल्या बॉलर्सना गंभीरनं व्यवस्थित हाताळलं. आणि चेन्नईला चेसेबल टार्गेटपर्य़ंत रोखण्यात यश मिळवलं. फायनलमध्ये अनुभवी महेंद्रसिंग धोनीची कॅप्टन्सी काहीच कमाल करू शकली नाही. तर  गौतमचं गंभीर नेतृत्व चांगलचं यशस्वी ठरलं.