वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजयाला गवसणी घालून दिल्ली राखली असली तरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला महासेंच्युरीने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे.
भारताने वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून विजय मिळविला. या विजयात वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या अर्धशतकांचा आणि भारतीय फिरकी गोलंदाज आर. अश्विन आणि प्रज्ञान ओझाचा वाटा महत्त्वाचा आहे.
दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शतकांच्या शतकासाठी क्रिकेट रसिकांना आणखी काही काळ वेटिंग करावं लागणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारर्किदीत ९९ सेंच्युरी झळकावणारा सचिन वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज देवेंद्र बिशूच्या गोलंदाजीवर ७६ धावांवर पायचित झाला आणि करोडो क्रिकेट रसिकांची निराशा झाली.
सचिनचं शतकांचं शतक अवघ्या २४ धावांनी हुकले आहे. तत्पूर्वी सचिनने आपल्या कसोटी कारकीर्दीतलं ६२वे अर्धशतक झळकावले. या अर्धशतकामध्ये १० चौकारांचा समावेश आहे.
दरम्यान चौथ्या दिवसाची सुरुवात होताच भारताला द्रविडच्या रुपात तिसरा धक्का बसला. फिडेल एडवर्ड्सने द्रविडला ३१ धावांवर बाद केलं. त्यानंतर आलेल्या व्ही व्ही एस लक्ष्मण आणि सचिन यांनी ७१ धावांची भागिदारी रचत विजय आणखी दृष्टीपथात आणला.