मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची महासेंच्युरी लांबल्याने हिरमोड झालेल्या क्रिकेट रसिकांना फिरकीपटू आर. अश्विनने केलेल्या दमदार शतकाने जाम खूष केले. अश्विनने आपल्या कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावत सर्वांना आनंदाचा धक्का दिला आणि टीम इंडियाला पहिल्या डावात ४८२ धावांपर्यंत मजल मारण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. वेस्ट इंडिजकडे १०८ धावांची आघाडी असून कसोटी ‘ ड्रॉ ’ च्या दिशेनं जाताना दिसते आहे.
पहिल्या डावात गोलंदाजी करताना ५ विकेट आणि फलंदाजी करताना शतक अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय ठरला आहे.
मुंबई कसोटीच्या आजच्या चौथ्या दिवशी सा-यांना प्रतीक्षा होती , ती सचिनच्या महाशतकाची... पण हे शंभराव शतक अवघ्या सहा धावांनी हुकलं आणि वानखेडेवर सन्नाटा पसरला. कर्णधार महेंद्रसिंग ढोणीही अवघ्या ८ धावा करून माघारी परतल्यानं टीम इंडियाची अवस्था ६ बाद ३३१ अशी झाली होती. फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी ६० धावा करणं‘ मस्ट ’ होतं आणि भरवशाचा फक्त एकच फलंदाज , विराट कोहली मैदानात होता. त्याला साथ देण्यासाठी आर. अश्विन मैदानात उतरला आणि बघता-बघता सगळं चित्रच पालटून गेलं. या दोघांची जोडी एकदम झक्कास जमली आणि फॉलोऑनचे ढग कुठच्या कुठे पसार झाले.
त्यानंतर , ४२८ धावा फलकावर लागल्या असताना विराट कोहली ५२ धावांवर बाद झाला. मग अश्विननं ईशांत शर्माला जोडीला घेतलं. ईशांतनं एक बाजू लावून धरली , त्यानं ३६ चेंडू खेळून काढले. तोपर्यंत अश्विन फटकेबाजी करत शतकाजवळ पोहोचला होता. ईशांतनंतर वरूण अॅरॉननं आणि नंतर प्रग्यान ओझानंही चांगला स्टँड देत अश्विनला शतक पूर्ण करण्याची संधी दिली आणि ती त्यानं अचूक साधली. १५ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं अश्विननं ११८ चेंडूंत १०३ धावा तडकावल्या.