www.24taas.com, नवी दिल्ली
पाकिस्तानच्या संसदेत अफजल गुरुच्या फाशीच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या संसंदेत ‘मातम’ पाळण्यात आला. पाकिस्तानच्या या कृतीवर आज भारताच्या संसदेत तीव्र प्रतिसाद उमटलेत. पाकनं भारताच्या अंतर्गत बाबीत नाक खुपसू नये, असं भारतानं पाकिस्तानला ठणकावून सांगितलंय.
पाकिस्तानच्या संसदेत गुरुवारी भारतीय संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरुच्या फाशीचा ‘मातम’ पाळण्यात आला तसंच अफझलचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला गेला पाहिजे, असा अनाहूत सल्लाही पाकिस्तान खासदारांनी भारताला दिला होता. पाकच्या या कृतीचे गुरुच्या फाशीच्या निषेधार्थ केलेल्या ठरावाचे तीव्र पडसाद भारतात उमटलेत. पाकिस्तानच्या या कृती म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वावर घाला असल्याची टीका विरोधकांनी केली. संसदेत पाकिस्तानच्या या खोडसाळपणावर सरकार आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार टीका केली. अफजलच्या फाशीचा निषेध म्हणजे पाकिस्तान दहशतवादाला आश्रय देत असल्याचं स्पष्ट होत असल्याचं सांगत 'पाकिस्तानशी राजनैतिक संबध तोडून टाका' अशी मागणी अरुण जेटली यांनी केली तर सरकारकडून राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला यांनी पाकिस्तानच्या नापाक कृतीचा निषेध केला.
पाकिस्तानच्या खोडसाळपणावर भारतातील विरोधी पक्षांनी कडाडून टीका केलीय
> पाकचा खोडसाळपणा माफियोग्य नाही - भाजप
> ही भारताचा अंतर्गत बाब आहे. पाकनं भारताच्या अंतर्गत बाबीत नाक खुपसू नये - शिवसेना
> पाकिस्तानची ही कृती म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वावर घाला - राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष
दरम्यान, पाकिस्तान सरकारच्या अफजल प्रेमाचे पडसाद आज जम्मू काश्मीर विधानसभेतही उमटले. भाजपनं पाकिस्तानच्या भूमिकेचा विधानसभेत निषेध केला. भाजप आमदारांनी यावेळी पाकिस्तान सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. पाकिस्तान सरकारच्या या ना पाक धोरणांना भारताने ताबडतोब उत्तर द्यावे अशी मागणी भाजप आमदारांनी केलीय.