शारीरिक संबंधांसाठी वयोमर्यादा १६ च!

संमतीनं शरीरिक संबंध ठेवण्याची वयोमर्यादा 16 वर्ष केल्यानं समाजातल्या विविध स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत. डॉक्टरांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. तर मानसोपचार तज्ज्ञांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 14, 2013, 10:02 PM IST

www.24taas.com, मुंबई
संमतीनं शरीरिक संबंध ठेवण्याची वयोमर्यादा 16 वर्ष केल्यानं समाजातल्या विविध स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत. डॉक्टरांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. तर मानसोपचार तज्ज्ञांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. राजकीय पक्षांनी कायद्याच्या दृष्टीनं सुसंगतता करण्याची गरज व्यक्त केली.
महिला अत्याचारविरोधी दुरूस्ती विधेयकावरील वादग्रस्त तरतुदींवर अखेर एकमत झालंय. यात सर्वात महत्वाची तरतूद म्हणजे संमतीनं शरीरसंबंधांसाठीची वयोमर्यादा कमी करण्यासंबंधीची. वयोमर्यादा कमी करण्याला महिला व बालकल्याण मंत्री क्रिष्णा तीरथ यांचा विरोध होता. मात्र त्यांचं मन वळवण्यात मंत्रिगटाला यश आलं. नव्या कायद्यात संमतीनं शरीरसंबंध ठेवण्याची मर्यादा 18 वरून 16 वर्षे करण्यात आलीय. मात्र यामुळं अनेक पेच निर्माण झाले आहेत.
देशाच्या कायद्यानुसार मुलींच्या सज्ञानतेचं वय 18 वर्षे आहे, लग्न करण्यासाठी 18 वर्षांची अट आहे, 18 वर्षांनंतरच मतदानाचा हक्क बजावता येतो तर मग संमतीनं शरीर संबंधांसाठी वयोमर्याचा 16च का असा सवाल उपस्थित होतोय.तर दुसरीकडे मुलगा आणि मुलगी हे दोन्ही आता लवकर वयात येत असल्यानं या नव्या तरतुदींचे डॉक्टरांनी स्वागत केलंय.
शारीरीक संबंध ठेवण्यासाठी 16 व्या वर्षी शरीरात महत्वपूर्ण बदल होत असले तरी मानसिकदृष्टया असे संबंध ठेवण्यासाठी हे वय योग्य नसल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे. यामुळं आणखी गुंतागुंत वाढण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केलीय.

यापूर्वीही संमतीने शारीरिक संबंधांची वयोमर्यादा 16 वर्षेच होती. मात्र दोन वर्षांपूर्वी सरकारनं ती वयोमर्यादा वाढवून 18 वर्षे केली होती. आता पुन्हा ही वयोमर्यादा 16 पर्यंत खाली आणलीय. अशा संवेदनशील आणि नाजूक मुद्यांवर सरकार वारंवार कायद्यात बदल करून गोंधळाचं वातावरण कशासाठी निर्माण करतं हा खरा प्रश्न आहे.