पालखीच्या मानावरून संत एकनाथांच्या वंशजांमध्ये वाद

संत एकनाथांच्या वंशजांमध्ये नाथषष्टीला हंडी फोडण्यावरून हाणामारी झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता पालखीचा मान कुणाचा यावरून पुन्हा एकदा वाद पेटला होता.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 26, 2013, 11:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
संत एकनाथांच्या वंशजांमध्ये नाथषष्टीला हंडी फोडण्यावरून हाणामारी झाल्याचं प्रकरण ताजं असतांनाच आता पालखीचा मान कुणाचा यावरून पुन्हा एकदा वाद पेटला होता. अखेर हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर आता हा वाद मिटलाय. मात्र संतांच्या घराण्यात सुरू असलेल्या या वादानं भाविक मात्र दुखावल्या गेलेत.
सहिष्णुतेची शिकवण समाजाला देणारे एकनाथ महाराज... नाथांच्या नावानं पैठणनगरीला जणू उत्तरकाशीचं रुप आलंय. मात्र त्यांच्या वंशजातल्या वादानं आता नाथवंशजांवर नामुष्की ओढवलीय. एका दत्तक विधानावरून नाथ वंशजांमध्ये धुमशान सुरुय. नेमकं काय आहे हा दत्तक विधानाचा वाद पाहूयात...
नाथ महारांजाची सध्या 14 वी पिढी हयात आहे. नाथांचे बारावे वंशज नारायणराव निपुत्रिक असल्यानं त्यांची बायको लक्ष्मीबाईंनी त्यांच्या सवतीच्या भावाचे म्हणजे पांडव कुटुंबीयांचे मुल रघुनाथराव यांना दत्तक घेतलं होतं. मात्र इतर नाथ वारसांना हे दत्तक विधान मंजूर नव्हतं. त्यांच्यानुसार रक्तातल्या नात्यातूनच घराण्यात दत्तक विधान होऊ शकतं असा त्यांचा दावा आहे... त्यातून पूजा कुणी करावी हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला. अखेर कोर्टानं दत्तक विधानाला मान्यताही दिली. मात्र कोर्टाचा हा निर्णय कदाचित नाथ वंशजांना मान्य नाही.
या दत्तक विधानाला मान्यता देताना नाथांची पंढरपूरला जाणारी दिंडी दत्तकपुत्र रघुनाथरावांनी घेऊन जावी असा आदेश देण्यात आला होता. मात्र वंशजांच्या वादात ही दिंडी 1996 पासून रघुनाथरावांऐवजी नाथांचे वंशज रावसाहेबच घेऊन गेले. आता अखेर ही दिंडी पंढरपूरसाठी नेता यावी म्हणून रघुनाथरावांनी हायकोर्टात दाद मागितली होती. त्यावर निर्णय देताना हायकोर्टानं रघुनाथरावांना दिंडी नेण्यास अनुमती दिलीय. त्याचबरोबर इतर नाथ वंशजांचा उपद्रव नको म्हणून काळजी घेण्याचे आदेशही कोर्टानं दिलेत. तर कोर्टाच्या आदेशाचे पालन करणार आहोत मात्र आम्हीही दिंडी घेऊन जाणार असल्याचं नाथांचे तेरावे वंशज सांगतायत..
यापूर्वीही 1971 ला दत्तक विधानानंतर दोन पालख्या काढण्याची वेळ आली होती. तर 2001 लाही नाथ वंशजाच्या भांडणात प्रशासनानालाच पालखीत पादुका ठेवण्याची वेळ आली होती. तर गेल्यावर्षी नाथषष्ठीला दहीहंदी फोडण्यावरून वाद झाला होता. नाथाच्या पालखीत दरवर्षी 15 हजाराहून अधिक भाविक पायी पंढरपूरला जातात. मात्र या भाविकांच्या भावना नाथ वंशजांच्या भावनाच पायदळी तुडवल्या जात असल्याचं मत वारकरी व्यक्त करतायत..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.