www.24taas.com, झी मीडिया, पुणे
जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान झालं. मुख्य मंदिरातून दुपारी २ वाजता तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झालं. त्यानंतर तुकोबारायांची पालखी इनामदारवाड्यात पोहचेल आणि इथंच पालखीचा मुक्काम असेल.
या पालखी सोहळ्यात सामील होण्यासाठी वारकरी मोठ्या संख्येनं देहूत दाखल झालेत... देहूनगरी वारक-यांनी गजबजून गेलीय. मोक्षाचं प्रवेशद्वार असलेली नगरी अर्थात आळंदी नगरी पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालीय... संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ३० तारखेला प्रस्थान ठेवेतेय... त्यासाठी आळंदी देवस्थान ट्रस्टची तयारी पूर्ण झालीय.
संथ वाहणारी इंद्रायणी नदी... इंद्रायणी काठी वसलेलं हे संत ज्ञानेश्वर माऊलींचं समाधी मंदिर... माऊलींच्या नामस्मरणात दंग झालेले वारकरी. आता या सा-यांना ओढ लागलीय ती पंढरीच्या सावळ्या विठूरायाच्या भेटीची... त्यासाठी विठूनामाचा जयघोष आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जप करत अनेक वारकरी आळंदीत दाखल झालेत.
येत्या 30 तारखेला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान ठेवतेय.. त्यासाठी आळंदी देवस्थान ट्रस्टची तयारी पूर्ण झालीय.. इथं येणा-या भाविकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आलीय.. तसंच 24 तास पाणीपुरवठ्याची सोयही करण्यात आलीय. तीन ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आलेत.. अतिक्रमण टाळण्यासाठी दोन विशेष पथक बनवण्यात आलीत. इंद्रायणी घाटासह तब्बल वीस ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत..
पालखी सोहळ्यासाठी होणारी वारक-यांची गर्दी लक्षात घेता पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. वारक-यांच्या सेवेसाठी प्रशासन आणि पोलीस सज्ज आहेत.. आता सा-यांना प्रतीक्षा आहे ते माऊलींच्या पालखीनं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवण्याची... हा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी सारेच आतूर झालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.