'चिंटू'चं म्युझिक लाँच दिमाखात

'चिंटू' हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाबरोबरच त्याचं संगीत काय असेल याचीही उत्सुकता अखेर संपली.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या चित्रपटाचं पुण्यात म्युझिक लाँच करण्यात आलं

Updated: Apr 25, 2012, 10:48 PM IST

www.24taas.com, पुणे

 

'चिंटू' हा बहुचर्चित चित्रपट  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाबरोबरच त्याचं  संगीत काय असेल  याचीही उत्सुकता अखेर संपली.मनसे अध्यक्ष  राज  ठाकरे यांच्या हस्ते या चित्रपटाचं पुण्यात म्युझिक लाँच करण्यात आलं आणि संदीप सलील यांची धमाल गीतं रसिकांच्या भेटीसाठी दाखल झाली आहेत

 

सर्वांच्याच मनात घर केलेल्या चिंटू या व्यंगचित्र मालिकेवर आधारित चिंटू चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. लहान मुलांसाठी असलेल्या या चित्रपटाचं संगीत कसं असेल याची सर्वांनाच उत्सुकता होती. ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ आणि ‘दमलेल्या बाबांची कहाणी’ नंतर संदीप आणि सलील ही जोडी पुन्हा एकदा लहानग्यासाठी संगीत देत असल्यामुळे सर्वचजण ‘चिंटू’ च्या संगीताची वाट पहात होते. अखेर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या चित्रपटाचं म्युझिकच पुण्यात लाँच करण्यात आलं. राज ठाकरे यांनीही या वेळी सर्वांचंच प्रचंड कौतुक केलं.

 

सलीलचा मुलगा शुबम्कर हा या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच गायक म्हणून समोर येतोय. त्यामुळेच संगीतकार म्हणून प्रचंड दबाव असल्याच सलीलने यावेळी स्पष्ट केलं. पण मुलगा म्हणून नाही तर एक गायक म्हणून त्यान उत्तम गायल्याचाही सलीलने सांगितलं. लहान मुलांची गाणी असल्यामुळे ती लिहिताना बरीच काळजी घ्यावी लागल्याच संदीपने यावेळी सांगितलं. या वेळी सलीलचा मुलगा शुभंकर याने चित्रपटातली गाणीही सादर केली. संदीप आणि सलील या जोडगोळीने यापूर्वीही रसिकांना त्यांच्या गीतांनी मंत्रमुग्ध केलं आहे. आता चिंटूचं संगीतही प्रेक्षकांना नक्की आवडेल यात शंका नाही...