हिंगोली : हिंगोलीच्या आझम कॉलनीत राहणारं आणि मजुरी करुन पोट भरणारं हे आहे धुळे दाम्पत्य. आठवीत शिकणारी त्यांची लाडकी लेक प्रियांका १४ जुलै २०१५ पासून अचानक गायब झाली. शेजारच्या महिलेनंच आपल्या लेकीला फूस लावून पळवून परराज्यात विकल्याचा आरोप धुळे दाम्पत्य करतंय. याबाबत तक्रार करण्यासाठी या दाम्पत्याला पोलीस स्टेशनचे अक्षरक्षा उंबरठे झिजवावे लागले..
या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल होऊन तब्बल ५ महिने उलटलेत तरीही प्रियांकाला शोधण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. पोलीस तपासच करत नसल्याचा आरोप करत प्रियांकाच्या आई-वडिलांनी मग काहीशी अशी साद घातली. माय-बाप पोलिसांना आपल्या लेकीला शोधण्याचं आवाहन हे पालक करतायत. त्यासाठी त्यांनी उपोषण केलं, जिल्हाधिकारी कार्यालयापुढं आंदोलन केलं मात्र दाद काही मिळाली नाही.
एकीकडे लेकीच्या चिंतेनं पालकाचा जीव कासावीस झाला असताना हिंगोली पोलीस मात्र सुट्ट्यांची मजा मारतातयत. या तपासाबद्दल जाणून घेण्यासाठी झी २४ तासची टीम पोहोचली असता सर्व जबाबदार अधिकारी सुट्टीवर असल्याचं आढळलं. जे उपस्थित होते त्यांनी कॅमे-यापुढं बोलण्यास नकार दिला..
समाजकंटकांनी आपल्या लेकीला विकलं की मारलं अशी काळजी या धुळे दाम्पत्याला वाटतेय. त्यामुळं लेकीला शोधण्याची या माता-पित्याची आर्त साद हिंगोली पोलिसांना ऐकू येईल का... हा प्रश्न अनुत्तरितच आहे.