www.24taas.com, झी मीडिया, इंफाळ
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची महिला सैनिक प्रीती बोळे हिचा गोळी लागून मृत्यू झाला. ती मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आपले कर्तव्य बजावत होती. प्रीती ही अमरावतीची आहे. दीड वर्षांपूर्वीच ती सीआयएसएफमध्ये रुजू झाली होती.
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेत ती होती. ही घटना बुधवारी सकाळी १०.२५ वाजता मणिपूरची राजधानी इंफाल येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घडली. प्रीती ही अमरावतीच्या गोपालनगर परिसरातील कैलासनगर येथील आहे.
नोएडा येथून प्रीतीला जून २०१३ रोजी मणिपूरला कर्तव्यावर पाठविण्यात आले होते. मणिपूरचे मुख्यमंत्री ओबाबीसिंह यांच्या इंफाळस्थित निवासस्थानासमोर ती कर्तव्यावर होती. बुधवारी प्रीतीला ९ एमएमची गोळी गळ्याला भेदून गेली. यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला इंफाळच्या जेएनआयएमएस रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, अतिरक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला.
प्रीतीचा मृतदेह नागपूरला आणण्यात आला. तेथून शासकीय वाहनाने प्रीतीचे पार्थिव अमरावतीच्या कैलास नगरातील निवासस्थान आणला. प्रीतीच्या पार्थिवावर शासकीय अंत्यसंस्कार करण्यात आले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.