www.24taas.com, औरंगाबाद
विनाअनुदानित शाळेत काम करणा-या शिक्षकांनी आज औरंगाबादेत बुट पॉलिश करून अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. या शिक्षकांच्या अनेक मागण्या गेल्या दहा ते बारा वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहेत. मात्र अद्याप त्या मागण्यांचा विचार सरकारने केलेला नाही. त्यामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
याकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातल्या क्रांती चौकात या शिक्षकांनी बुट पॉलिश करून शासनाच्या धोरणांचा निषेध केला..प्रमुख्यानं ज्या मागण्या आहेत त्यामध्ये शिक्षकांना पूर्ण वेतन लागू करावं...विना अनुदानित शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना सवलती आणि पाठ्यपुस्तके मिळावी, या आणि अशा इतरही मागण्यांसाठी हे आंदोलन केलं गेलं. एकीकडे सरकार शिलकीचा अर्थसंकल्प सादर करते.
मात्र दुसरीकडे या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी सरकारकडे पैसे नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे शासनाच्या या दुटप्पी भूमिकेला यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. प्रलंबित मागण्या त्वरित मान्य झाल्या नाहीत. तर शिक्षक 28 मार्चला शिक्षणमंत्र्यांना घेराव घालतील, असा इशारा मुप्टा प्रणित महाराष्ट्र विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेत्तर कृती समितीनं दिलाय.