www.24taas.com, अकोला
रॅम्पवॉक म्हटला की डोळ्यासमोर येतात त्या लचकत मुरडत चालणाऱ्या मॉडेल्स... विविधरंगी प्रकाशझोतात रंगून गेलेला रॅम्प... मात्र या साऱ्या गोष्टींना छेद देणारा आणि तुम्हालाही आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जाईल, असा फॅशन शो रंगला तो अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये...
तुमच्या कल्पनेतील फॅशन शोपेक्षा वेगळा असा बैलगा़डींचा फॅशन शो अकोट शहरात पार पडला. ‘अकोट ज्युनियर चेंबर्स इंटरनॅशनल’ या संघटनेनं हा फॅशन शो आयोजित केला होता. कृषी आणि कृषी क्षेत्रात महत्त्वाचं स्थान असलेल्या साहित्याला मानाचं स्थान मिळावं म्हणून हा अनोखा बैलगाडी फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी बैलगाड्यांना नववधूप्रमाणे सजवण्यात आलं होतं. या आगळ्या वेगळ्या फॅशन शोला शेतकऱ्यांनीही भरभरुन प्रतिसाद दिला. या फॅशन शोला समाजप्रबोधन आणि लोकशिक्षणाचीही किनार लाभली होती. या फॅशन शोमधून स्त्रीभ्रूण हत्या, दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या विविध गंभीर विषयांवर भाष्य करण्यात आलं होतं. या फॅशन शोमध्ये विजेत्या बैलगाडीसाठी स्पर्धकांना रोख बक्षिसं देण्यात आली.