www.24taas.com, धुळे
नंदूरबार जिल्ह्यातल्या टेंभली या गावातून केंद्र सरकारने आधारकार्ड योजनेची सुरूवात केली. पण या गावच्या सरपंचांनाच अद्याप आधारकार्ड मिळालं नाही तर आदिवासी बांधवांना आधारकार्ड काय हेही माहित नाही. म्हणजे जेथुन या आधारकार्ड योजनेला सुरूवात झाली तिथेच आधारकार्ड मिळाल नसल्याचं वास्तव आहे.
नंदूरबार जिल्ह्यातल्या टेंभली गावात मोठा गाजावाजा करून केंद्र सरकारनं आधारकार्ड योजनेचा शुभारंभ केला. आणि त्या माध्यमातून आर्थिक लाभ देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. मात्र टेंभली गावातच आधारकार्ड योजनेचा बोऱ्या वाजलाय...
टेंभली गावाची लोकसंख्या 1575 आहे मात्र त्यातल्या 1350 जणांना आधारकार्ड मिळाली आहेत. त्याच्या शेजारच्या आसुसगावातल्या 700 लोकसंख्येपैकी कुणालाच आधारकार्ड मिळालेलं नाही. तर 350 लोकांची वस्ती असलेल्या होळगुजरी गावातही एकाही जणाला आधारकार्ड मिळालं नाही.
जिल्ह्यातले अधिकांश आदिवासी पाडे अजूनही आधारकार्डच्या नोंदणीपासूनच वंचित आहेत. विशेष म्हणजे आधारकार्डची नोंदणी झालेले आणि प्रत्यक्ष कार्ड मिळालेल्या व्यक्तींची संख्याही प्रशासनाच्या दफ्तरी नाही. अधिकारी मात्र सर्व काही आलबेल असल्याचा आव आणत आहेत.एकंदरितच आर्थिक लाभ प्रत्यक्ष नागरिकाला देण्याची सरकारची योजना ही दिवास्वप्नच असल्याचं दिसतंय.