www.24taas.com, लातूर
अजित पवारांच्या राजीनामा नाट्यापाठोपाठ नाराजीनाट्यही पुढं आल्यानं राष्ट्रीवादीचं नेतृत्व सुप्रिया सुळेंकडे जाणार असल्याच्या चर्चेला ऊत आलाय. मात्र सुप्रिया सुळेंनी याबाबत पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडून सर्व तर्क-वितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न लातूरमधल्या युवती मेळाव्यात केला.
आपण केवळ आगामी लोकसभाच नव्हे तर २०२८ पर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं सांगून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय. एवढंच नव्हे तर अजितदादा मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आनंदच होईल, असा पुनरुच्चार सुप्रिया सुळे यांनी केलाय.
सुप्रिया सुळेंनी सध्या राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती मेळाव्यांचा धडाका लावलाय. त्यामुळं राष्ट्रवादीची धुरा महिलांकडे येणार की काय? अशा चर्चांनाही यामुळं ऊत आलंय. मात्र, सुप्रिया सुळेंनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडून राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबाबतच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.