www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबादहून पकडण्यात आलेला काशीद बियाबानी जफर बियाबानी हाच पुणे बॉम्सस्फोटाचा मास्टरमाईंड असल्याचं एटीएसच्या तपासात पुढं आलं आहे. पुणे बॉम्बस्फोटात पकडण्यात आलेले आरोपी, असद खान, इम्रान खान आणि इरफान या दहशतवाद्यांची काशीदनंच या कामासाठी नेमणूक केल्याची माहिती पुढे आलीय.
बुधवारी मुंबई एटीएसनं औरंगाबादच्या गणेश कॉलनीतून त्याला ताब्यात घेतलंय. काशीद हा उच्चशिक्षित असून त्यानं कायद्याची पदवी घेतलीय. काशीदच्या घरची सगळीच मंडळी वकील आहेत. काशीद हा वेरूळ शस्त्रसाठा प्रकरणातील फरार दहशतवादी फैय्याज कागझीचा जवळचा साथीदार असल्याची माहितीही पुढं आलीय. पुणे बॉम्बस्फोटांसाठी काशीदनेच असद खान, इम्रान खान आणि इरफान यांची निवड केली होती. काशीदचा भाऊ सय्यद अकिब हा गेल्या सात वर्षांपासून वेरूळ शस्त्रसाठा प्रकरणात जेलमध्येच आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेले जबिउद्दीन अन्सारी आणि फैय्याज कागझीसोबत काशीदच्या भावाचे संबंध होते आणि त्यातूनच काशीदचीसुद्धा यांच्यासोबत ओळख झाली. फय्याज कागझीसोबत काशीदनेच ओळख करून दिल्याची कबुली अटकेत असलेल्या असद खानने एटीएसला दिली आहे. फैय्याज कागजीने पुणे स्फोटासाठी असदला हवालामार्फत पैसैही पाठवले आणि त्यानंतर घडून आला पुण्याचा साखळी बॉम्बस्फोट...
२०१० मध्ये काशीद हज यात्रेला गेला होता. त्यावेळी सौदीत त्याने फैयाज कागजीची भेट घेतली. असद खानचा औरंगाबादेतच प्लॉटींगचा व्यवसाय होता. त्याचबरोबर टूर आणि ट्रॅव्हल्सचाही धंदा होता. त्यात असदसोबत काशीदचीही भागिदीरी असल्याची माहितीही पुढे येतेय. याच ट्रॅव्हलच्या ऑफिसमध्ये या सगळ्यांची काशीद बैठकही घेत असल्याची माहिती पुढे आलीय. कागजीच्या सांगण्यावरूनच काशिदनं भारतात स्फोट घडवून आणण्यासाठी तरुणांची भरती सुरु केली. मराठवाड्यातील बरेच तरूण काशीदच्या संपर्कात असल्याचं समजतंय. पोलीस त्या सगळ्यांचा शोध घेतायत. मात्र दहशतवाद्यांच्या या मराठवाडा कनेक्शनचा काशीद एक महत्त्वाचा सूत्रधार होता हे आता स्पष्ट झालंय.