www.24taas.com, बीड
बीडच्या आदित्य दंत महाविद्यालयात एक संतापजनक प्रकार घडलाय. महाविद्यालयातल्या गैरप्रकारांची तक्रार केल्याबद्दल इथल्या सहा विद्यार्थिनींना चक्क हॉस्टेलबाहेर काढून कर्मचा-यांच्या घरी राहण्यास भाग पाडण्यात आलंय..
डोळ्यात डॉक्टर बनण्याचं स्वप्न घेऊन विद्यार्थिनींनी बीडच्या आदित्य दंत महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. मात्र संस्था संचालिकेची दादागिरी आणि तिच्याकडून होणा-या मानसिक त्रासामुळं या विद्यार्थिनींची स्वप्नं धुळीस मिळाली. याबाबत आणि संस्थेतील अपु-या व्यवस्थेबद्दल या मुलींनी एका सामाजिक संस्थेमार्फत आवाज उठवला.. मात्र या कृत्यामुळं संतापलेल्या संचालिका अदिती सारडा यांनी सहा विद्यार्थिनींना गेट आऊटचा सल्ला दिला. शिवाय चक्क 2 दिवस कर्मचा-यांच्या घरी झोपण्यास भाग पाडलं..
मुलींचा छळ एवढ्यावरच थांबला नाही. संचालिकेचा मुलगा आदित्य इतर महाविद्यालयांच्या निवडणुकीसाठी वापर करुन घेत असल्याचा आरोपही विद्यार्थिनींनी केलाय. त्यासाठी खुद्द संस्थाचालिका दबाव टाकत असल्याचाही गौप्यस्फोट त्यांनी केलाय.
विद्यार्थिनींच्या आरोपांमुळं संतापलेल्या संचालिका अदिती सारडा यांनी त्यांना धमकी दिली. यामुळं एक विद्यार्थिनी भोवळ येऊन पडली. दुसरीकडे वातावरण तंग झाल्यानं घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी चक्क मुलींनाच कॉलेज बदलण्याचा सल्ला दिला. इथं ऍडमिशन घेताना तुम्ही याचा विचार करायला हवा होता, असा सल्ला देत पोलिसांनी चक्क या प्रकारावर हास्याचे कारंजे उडवले.
या घटनेमुळं पालकांचाही संताप उडालाय. विद्यार्थिनींचे प्रवेश परत करुन त्यांना सरकारनं इतर कॉलेजमध्ये प्रवेश द्यावा अशी मागणी त्यांनी केलीय. मुली आणि महिलांवरील अत्याचारांमुळं सारा देश ढवळून निघालाय.. मात्र बीडच्या आदित्य दंत महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींच्या आरोपांमुळं पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा गेलाय.