www.24taas.com, जळगाव
आमदार सुरेश जैन यांचा जामीन अर्ज आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला त्यामुळे जैन यांची डोकेदुखी वाढली आहे. घरकुल घोटाळ्यातील संशयित आरोपी म्हणून जैन यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय.
सुरेश जैन यांनी २३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. विशेष न्यायालयाने गुन्ह्यांची दखल घेतली नाही, संशयित आरोपींना नोटीस काढली नाही, खटला चालविण्यासाठी सरकारची परवानगी घेतली नाही आदी कारणांचा विचार करता संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत पाठविता येत नाही, अशा कारणांचा त्यात समावेश होता. सर्वोच्च न्यायालयाने ही सर्व कारणे फेटाळत त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला.
सुरेश जैन यांचा जामीन अर्ज यापूर्वी जिल्हा न्यायालयात ६ ऑक्टोतबर २०१२ला तर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात १७ डिसेंबरला फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी २३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात चार कारणांवर दाखल केलेला जामीन अर्ज मुख्य न्यायमूर्ती अल्तमश कबीर, न्या. चंगमेश्वर रॉय व न्यायमूर्ती सेन यांच्या घटनापीठाने फेटाळला. त्यामुळे जैन यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.