www.24taas.com, मुंबई
बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शनिवारी दुपारी ३.३३ वाजता अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. महाराष्ट्राच्याच नव्हे तर अवघ्या देशाच्या राजकारणात गेली पाच दशके घोंगावणारे वादळ शांत झाले. आज रविवारी बाळासाहेबांना शिवतीर्थावरच सायंकाळी ५ वाजता अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. त्याआधी सकाळी अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिव ठेवण्यात येणार आहे. शेवटचे दर्शन घेता यावे म्हणून मुंबईत शिवसैनिकांचा लाखोंचा जनसागर उसळला आहे.
ज्या शिवतीर्थावरून (शिवाजी पार्क, दादर) बाळासाहेबांचे ज्वलंत, ओजस्वी आणि रोखठोक विचार देशाने ऐकले, ज्या शिवतीर्थावरून वक्तृत्वाच्या बळावर बाळासाहेबांनी अख्खी नवी पिढी घडवली, ज्या शिवतीर्थावरून त्यांनी विरोधकांना फटकारेल, एकच नेता आणि एकच मैदान हे अलौकिक भाग्य ज्या मैदानाच्या ललाटावर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले, त्या शिवतीर्थावरच बाळासाहेबांना आज रविवारी अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.
बाळासाहेबांच्या प्रकृतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चढऊतार सुरू होता. लीलावती रुग्णालयाचे डॉ. जललील परकार त्यांच्यावर उपचार करीत होते. ‘मातोश्री’वरच संपूर्ण उपचाराची व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या शनिवारी त्यांची प्रकृती कमालीची खावल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र रविवारी पुन्हा त्यांच्या प्रकृती सुधारत होत असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले होते.
बुधवारी पुन्हा अचानक शिवसेनाप्रमुखांची प्रकृती खालावली. त्यांची प्रकृती खालवल्याचे वृत्त पसरताच हजारो शिवसैनिक आणि बाळासाहेबांच्या चाहत्यांनी ‘मातोश्री’कडे धाव घेतली. गुरुवारी सकाळपासून विविध मान्यवरांनी ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतल्यामुळे बाळासाहेबांच्या चिंतेचे वातावरण पसरले होते. बाळासाहेबांनी अखेरचा जय महाराष्ट्र शनिवारी केला.