हिंदुह्रद्यसम्राट आणि मराठी माणसाची जुळली नाळ...

मराठी माणसाच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या प्रश्नांना संघटित रुप मिळालं आणि लढा सुरू झाला... मराठी माणसाच्या हक्कासाठी...

Updated: Nov 17, 2012, 06:14 PM IST

www.24taas.com, मुंबई
मराठी माणसाच्या कल्याणाची शपथ घेत शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसाच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या प्रश्नांना संघटित रुप मिळालं आणि लढा सुरू झाला... मराठी माणसाच्या हक्कासाठी... सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता स्थानिकांच्या रोजगाराचा... देश स्वतंत्र झाल्यावर नवं अर्थकारण आकार घेत होतं, मुंबईत दाक्षिणात्यांचं वाढलेलं प्रमाण मराठी माणसावर शिरजोर होत होतं... स्थानिकांना रोजगार मिळत नव्हता... रोजगारातला ८० टक्के वाटा स्थानिकांचा असावा, ही शिवसेनेची सुरुवातीपासूनची भूमिका... दाक्षिणात्यांविरोधात रोष वाढत असताना शिवसेनेनं नारा दिला हटाव लुंगी, बजाव पुंगी... आंदोलनाला जोर चढला आणि दाक्षिणात्य लोकांना खरोखरच लुंगी सावरत मुंबईतून पळ काढावा लागला. परप्रांतीयांविरोधातलं हे मुंबईतलं पहिलं आंदोलन... हाच परप्रांतीय मुद्दा पुढच्या काळात राजकारणाचा हुकमी एक्का बनला.
महाराष्ट्रात रहायचं असेल तर मराठीशी वैर करुन चालणार नाही, हा दट्ट्या सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेनं घालून दिला. त्याकाळी इतर भाषांमध्ये असलेल्या दुकानांच्या पाट्यांवर शिवसैनिकांनी काळं फासायला सुरुवात केली. आंदोलनांनी अपेक्षित परिणाम साधला आणि मुंबईत दुकानांवरच्या पाट्या मराठीत दिसायला लागल्या.
महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेनं वाचा फोडली. त्याहीआधी सीमाप्रश्नावरुन मार्मिकमध्ये बाळासाहेबांचे फटकारे सुरूच होते. सीमाभागातल्या मराठी बांधवांच्या व्यथा शिवसेनेनं जाणल्या. सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यासाठी मोरारजी देसाईंच्या काळात सीमाप्रश्नाचं आंदोलन चांगलंच चिघळलं. शिवसैनिकांनी मोरारजी देसाईंची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, तरीही मोरारजी देसाईंनी गाडी पुढं नेल्यानं शिवसैनिक चिडला. आंदोलन इतकं पेटलं की ५२ शिवसैनिकांचा या आंदोलनात बळी गेला. दुर्दैवानं आजही सीमाप्रश्न प्रलंबितच आहे.
यंत्रयुगानं गिरणी कामगार देशोधडीला लावला. त्याच्यासाठी शिवसेनेनं अनेक आंदोलनं आणि मोर्चे काढले. गिरणी कामगारांसाठी प्रसंगी जॉर्ज फर्नांडिस, शरद पवारांबरोबर एकत्र आले. पण दुर्दैवानं शिवसेनेच्या या लढ्याला मर्यादित यश मिळालं. बेस्टमध्ये मराठी सूचना असाव्यात, हा शिवसेनेचाच आग्रह... बॉम्बेची मुंबई झाली ती शिवसेनेच्याच प्रयत्नानं... या सगळ्या आंदोलनाचं गमक होतं ते बाळासाहेबांचं निर्भीड नेतृत्व आणि आक्रमक भाषा... त्यामुळेच मराठी माणूस एकत्रित होऊन रस्त्यावर उतरला... पुढच्या काळात मराठीच्या मुद्द्यावरुन व्यापक होत बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा प्रचार केला...
बाबरी मशीद प्रकरणानंतर बाळासाहेब चांगलेच आक्रमक झाले. देशविरोधी कारवाया करणाऱ्या धर्मांध मुसलमानांना देशात राहण्याचा अधिकार नाही, असं वादग्रस्त मत समाजासमोर मांडलं. हिंदुत्वाच्या कार्डावर मतदान होतं, हे बाळासाहेबांचं मत खरं ठरलं आणि २००० साली एनडीए हिंदुत्वाच्या कार्डावर सत्तेवर आलं. बाळासाहेबांच्या बिरुदावलीत हिंदुहृदयसम्राट ही उपाधीही जोडली गेली. जो विचार करायचा तो तडीस न्यायचा... बाळासाहेबांनी मांडलेला विचार चूक की बरोबर हा यावर वाद होऊ शकतो. पण प्रसंगी प्रवाहाविरोधात भूमिका घेण्याचं धाडस दाखवणारे बाळासाहेब वेगळेच... शब्दाला शंभर टक्के जगणारा नेता होता म्हणूनच शिवसेनेच्या आंदोलनांना यश मिळालं. आजही याच मुद्द्यांवर राजकारण केलं जातंय. पण या मुद्द्यासाठी पहिल्यांदा लढली ती शिवसेना आणि बाळासाहेबच...