www.24taas.com, मुंबई
`पैलतीराचा प्रवास सुरू करण्याची वेळ जवळ आली आहे`, असं म्हणतं, बाळासाहेबांनी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्याजवळ त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळेसेच लता मंगेशकर प्रचंड अस्वस्थ झाल्या होत्या. लता मंगेशकरांनी ४ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी ठाकरे यांनी मी खूप थकलोय, अशी भावना लताबाईंकडे व्यक्त केली होती. त्याचवेळी त्यांनी आपल्या मृत्यूची वेळ जवळ आली असल्याचे म्हटले होते, असे लता मंगेशकर यांनी सांगितले.
लता मंगेशकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची ती शेवटची भेट ठरली. लताबाईंनी बाळासाहेबांना नमस्कार केल्यावर त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. लताबाई आणि बाळासाहेबांनी त्या दिवशी वेगवेगळ्या विषयांवर खूप चर्चा केली. लताबाईंची मराठी गाणी आजही मला ऐकायला आवडतात, असेही बाळासाहेबांनी त्यांना यावेळी सांगितले होते.
मराठी माणसांच्या नेत्याचे निधन झाल्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे. मराठी माणूस अनाथ झाला आहे, बाळासाहेब गेल्याचे अतिशय दु:ख होत आहे.