बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागेचा शोध

शिवसेनेनं शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विरोध करणा-यांना कडक इशारा दिलाय. अर्थात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी शिवसेना दुस-या जागेच्या शोधात असल्याचंही स्पष्ट करण्यात आलय

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 2, 2012, 06:38 PM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेनेनं शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विरोध करणा-यांना कडक इशारा दिलाय. अर्थात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी शिवसेना दुस-या जागेच्या शोधात असल्याचंही स्पष्ट करण्यात आलय. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंग यांनी अग्नीसंस्कार झालेल्या ठिकाणी बांधण्यात आलेला चौथरा पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन करणारा असल्याची तक्रार दाखल केलीय.
मुंबईतल्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांवर जिथं अग्निसंस्कार झाले तिथं तयार करण्यात आलेला चौथरा हटणार नाही अशी सक्त ताकीद शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलीय. मात्र बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसेना पाच एकर जागेच्या शोधात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलय.
तर दुसरीकडे शिवाजी पार्कवर तयार करण्यात आलेल्या चौथ-याबाबत मुंबई महापालिकेनं आक्षेप घेतलाय. या वादात सामिजक कार्यकर्ता आभा सिंग यांनीही उडी घेतलीय. हा चौथरा पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन करणारा असल्याची तक्रार त्यांनी केलीय.
राज्य सरकारनेही यापूर्वीच कायदेशीर अडचणी समोर करून शिवाजी पार्कवर स्मारकाबाबत हात वर केलेत.
डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी शिवाजी पार्कवर येणार आहेत. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आलेल्या ठिकाणाच्या दर्शनासाठीही शिवसैनिक मोठ्या संख्येनं येतायेत. त्यामुळे सरकारसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्यायेत.