शिवसेनेची राजकीय भविष्यवाणी

Updated: Nov 9, 2015, 10:52 PM IST
शिवसेनेची राजकीय भविष्यवाणी title=

ही एक राजकीय भविष्यवाणी आहे, कोणत्याही राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी ही भविष्यवाणी मनावर घेऊ नये, काही व्यक्ती भविष्यवाणी करतात, तेव्हा ते भविष्य सांगतात की सूचना-सल्ला देतात हेच कळत नाही, तशा प्रकारचे राजकीय भविष्य लिहण्याचा हा प्रयत्न आहे. 

आमच्यासारखे कुणीही कितीही भविष्य लिहिले, तरी अखेर राजकीय पक्षांचे भविष्य जनतेच्या हाती असते, जनतेच्या भावना समजून घेण्याच्या प्रयत्नात, शिवसेनेसाठी दिवाळी पहाट निमित्त लिहलेले हे भविष्य.

वाचा शिवसेनेची राजकीय भविष्यवाणी
शिवसेनेला पुढील काळात बाहेरील शत्रूंपेक्षा अंतर्गत शत्रूंचा त्रास अधिक होणार आहे, यामुळे शिवसैनिकांची नजर पक्षनेतृत्वाच्या निर्णयाकडे लागून असणार आहे. मित्र, शत्रू पक्षाकडून भविष्यात शिवसेनेची जेवढी कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, तेवढी कोंडी यापूर्वी कधीही झालेली नसेल, मात्र शिवसेना नेतृत्व जर ही कोंडी सहन करत असेल, तर शिवसैनिक नाराज होतील, हे स्वाभाविक आहे.

मात्र शिवसेनेने आपला मान सन्मान कायम ठेऊन मित्र, शत्रू पक्षाला उत्तर दिलं, तर शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढणार आहे, हा आत्मविश्वास शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत कामी येणार आहे. मुंबई महापालिकेतील सत्ता शिवसेनेसाठी सर्वात महत्वाची आहे, जर त्यांनी खऱ्या शत्रूंना ओळखलं नाही, तर पुढील काळ पक्षासह नेतृत्वासाठीही कठीण असू शकतो.

ग्रामीण जनतेचेही शिवसेना आणि शिवसेनेच्या मित्र, शत्रू पक्षांच्या हालचालींवर नजर आहे. राष्ट्रवादीसारख्या पक्षाला देखील शिवसेनेने ग्रामीण भागात तोडीस तोड उत्तर दिलं आहे, यामुळे राज्यात दुष्काळ असतांना शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून शिवसेनेला चालणार नाही, हे भविष्यकाळात देखील स्पष्ट होणार आहे.

काही पक्षांच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे, काही महिन्याच त्यांच्याविषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची नजर आता शिवसेनेकडे लागून आहे, यासाठी राज्यभर दौरे काढल्यास प्रवासाचा योग पुन्हा संभवतो.

शेतकऱ्यांना शिवसेनेकडून दिलासा मिळण्याची शक्यता वाटत असल्याने, शिवसेनेकडेही ते सहानुभूतीपूर्वक नजरेने पाहत आहेत, मात्र शिवसेनेने आपला राजकीय दरारा कायम ठेवला, तरंच ही सहानुभूती कायम राहणार आहे.

मात्र नको तिथे गरजेपेक्षा जास्त तडजोड केल्यास, शिवसेनेकडून दिलासादायक चित्र न दिसल्यास, राष्ट्रवादी ग्रामीण भागात पुन्हा जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या मुसंडीचा शिवसेनेला फारसा फटका बसेल, असेही दुसऱ्या बाजूने वाटत नाही. कारण त्यांच्याकडे नुकसानी एवढा आकडा सध्या नाही.

राजकीय शांतीसाठी हे करता येईल?
घड्याळला आठवड्यातून एकदा जाहीरपणे वरवर का असेना प्रेमाने (विचारावे) पुसावे, यामुळे तुम्हाला हितशत्रुंचा त्रास कमी होणार आहे. कारण घड्याळचे आता गरजेपेक्षा जास्त कान पिळल्यास, स्प्रिंगसारखे संबंध तुटतील, त्यामुळे राजकीय दबदबा निर्माण करण्यास अडचणी येतील.

कारण घड्याळचे काटे हे गोलाकार पद्धतीने फिरतात, घड्याळाला १२, ३, ६ आणि ९ हे आकडे सारख्या अंतरावर आहेत, मात्र आपल्याला टायमिंग पाहण्याची सवय असल्याने, ज्याच्याजवळ काटा तो घड्याळचा प्रिय असे आपणास वाटत असावे, पण ते तसे आहेच असे नाही.

जेव्हा घड्याळ, धनुष्य आणि कमळ हे एकाच रेषेवर येतील, तेव्हा राजकीय ग्रहण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. घड्याळ आणि धनुष्य एकाच रेषेत आल्यास कमळावर सावली पडू शकते.

अतिशय गंभीर राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यास 'बिहारी मंत्राचा जप' करण्यास हरकत नाही. पुढील ठेवणीतला मंत्र जपावा, 'बिहारी बनाम 'बहारी',  या आधी इंजीनला टायमिंग साधण्यासाठी, स्वकीयांना एकत्र येण्याची सूचना करण्यासाठी घड्याळ कामी येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.