लाजलात तर संपलात!

अशाही काही गोष्टी आहेत ज्या करताना कधीही लाज बाळगण्याची गरज नाही. हे आपण आपल्या मनात बिंबवलं तर आपल्याला एखाद्या गोष्टीला नाही म्हणताना किंवा ती गोष्ट करताना कमीपणा किंवा लाज वाटणार नाही...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 15, 2013, 08:10 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एखाद्या व्यक्तीचा स्वभाव थोडा बुजरा असेल तर साहजिकच इतर लोक त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. पण, हेच एखाद्या सडेतोड स्वभावाच्या व्यक्तीच्या बाबतीत घडत नाही. त्यामुळे आपण नाही म्हणायला शिकायला हवंच. पण अशाही काही गोष्टी आहेत ज्या करताना कधीही लाज बाळगण्याची गरज नाही. हे आपण आपल्या मनात बिंबवलं तर आपल्याला एखाद्या गोष्टीला नाही म्हणताना किंवा ती गोष्ट करताना कमीपणा किंवा लाज वाटणार नाही... चला तर पाहुयात कोणत्या आहेत या गोष्टी..
 सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पैशाची देवाण-घेवाण. पैशाच्या व्यवहारात हलगर्जीपणा करणाऱ्याला त्याच्या वाईट काळात कुत्रंसुद्धा उभं करत नाही. त्यामुळे तुम्ही कष्टानं कमावलेला पैसा योग्य पद्धतीनं वापरा. एखादा व्यवहार करताना हलगर्जीपण करू नका किंवा लाजेखातर व्यवहार करू नका. त्यामुळे नक्कीच तुमचं नुकसान होऊ शकतं. एखाद्याला उधार म्हणून पैसे दिले असतील तर ते परत मागताना लाज बाळगण्याची काही एक गरज नाही. जर तुम्ही पैसे मागण्यासाठी असक्षम ठरलात तर तुम्हाला ते पैसे परत मिळण्याची शाश्वती नाही.
 कोणत्याही व्यक्तीनं पैशाच्या संबंधित कामामध्ये संकोच बाळगू नये. पैशाचा जो काही व्यवहार आहे, तो स्पष्टपणे बोलून करावा अन्यथा भविष्यात वाद होण्याची पूर्ण शक्यता राहते. त्याचप्रकारे शिक्षणासंबंधी लाज बाळगू नये. एखादी गोष्ट शिकण्याची इच्छा असेल तर ते सांगण्यात लाजू नये. अन्यथा आयुष्यभर अज्ञानी राहावे लागण्याची शक्यता आहे.
 जो व्यक्ती खाण्याच्या बाबतीती संकोच बाळगतो त्याला उपाशीच राहावे लागतं. त्यामुळे भूक लागल्यानंतर जेवण करून घ्यावं. त्याचप्रकारे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने ग्राहकांशी स्पष्ट बोलून व्यवहार करावा. पैसा आणि सामान यासंबंधीच्या गोष्टी स्पष्ट आणि रोखठोक बोलून कराव्यात.
 धन-धान्याची देवाण-घेवाण, विद्याध्ययन, भोजन, व्यवसाय ही चार कामे करताना लाज बाळगू नये, असं म्हटलं जातं, ते काही खोटं नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.