अंत्यदर्शनानंतर का करतात स्नान?

मृतदेहाचं अंत्यदर्शन घेणारे आणि पार्थिव स्मशानात पोहोचवून आलेले लोक घरी गेल्यावर अंघोळ करतात. यामागील कारण काय आहे?

Updated: Aug 8, 2012, 04:14 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिची अंत्ययात्रा काढली जाते. स्मशानात तिचं दहन केलं जातं. यानंतर घरातील लोकांना सुतक लागतं, तर मृतदेहाचं अंत्यदर्शन घेणारे आणि पार्थिव स्मशानात पोहोचवून आलेले लोक घरी गेल्यावर अंघोळ करतात. यामागील कारण काय आहे?

 

शास्त्रात सांगितलं आहे की मृतात्म्याभोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते. निधनामुले वातावरणातील सकारात्मकता, चैतन्य लोप पावलेलं असतं. स्मशानातही होणारी कार्यं ही नकारात्मक प्रभाव पाडत असतात. यावेळी मृत व्यक्तीचं स्थूल शरीर जरी दहन होत असलं, तरी सूक्ष्म शरीर काही काळ या ठिकाणीच वास्तव्य करून राहत असतं. यातून नकारात्मक ऊर्जा निरमाण होत असते. या ऊर्जेचा मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. अंत्यदर्शनामुळे मनावर एक प्रकारचं मृत्यूचं सावट आलेलं असतं. या सर्व विचारांना आणि भावनांना मनातून काढण्यासाठी स्नान केलं जातं. स्नान केल्यावर आपोआप शूचिर्भूत झाल्यासारखं वाटतं. प्रसन्न वाटू लागतं. त्यामुळे अंत्यदर्शनानंतर स्नान करायची पद्धत रुढ झाली आहे.

 

यामागील वैज्ञानिक कारण असं, की मृतदेह हा हळूहळू सडण्यास सुरूवात होऊ लागली असते. त्यामुळे वातावरणात अनेक प्रकारचे सूक्ष्म किटाणू पसरतात. स्मशानातील वातावरणातही अशा किटाणूंची संख्या वाढलेली असते. या किटाणूंचा संसर्ग होऊन त्याचे आपल्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे स्नान करून स्वच्छ होणं हे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही आवश्यक आहे.