१९६५चे युद्ध: शौर्याच्या बळावर भारताने पराभूत केले पाकला

Updated: Oct 6, 2015, 02:04 PM IST


ब्रिगेडिअर हेमंत महाजन 

ब्रिगेडिअर हेमंत महाजन :  चीनविरोधात १९६२च्या युद्धात मोठी हार पत्करावी लागल्यानंतर भारतीय सैन्याचे मनोधैर्य खचलेले होते. याच काळात १९६५च्या पहिल्याच महिन्यात पाकिस्तानी सैन्याने मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करून भारताविरोधात अघोषित  युध्द पुकारले. जुनाट शस्त्रसाठा असलेल्या भारतीय सैन्याचा आपल्यापुढे निभाव लागणार नाही, असा विचार करून पाकिस्तानने अत्याधुनिक पॅटन’  रणगाडे आणि सेबर जेट विमान आणि आधुनिक हत्यारांसह भारतीय लष्करावर हल्ला केला. मात्र भारतीय सैन्याने आपल्या युध्दकौशल्य, आणि शौर्याच्या बळावर पाकिस्तानचा हल्ला केवळ परतवूनच लावला नाही, तर पाकिस्तानच्या लाहोर आणि सियालकोट या महत्त्वाच्या शहरांपर्यंत मजल मारली. यामुळे घाबरून गेलेल्या पाकिस्तानने पंजाबच्या खेमकरण भागात रणगाड्यांनी हल्ला केला. मात्र भारतीय सैन्याच्या युध्द डावपेचामुळे त्यांना आपल्या शेकडो आधुनिक रणगाड्यांवर पाणी सोडावे लागले. १९६२च्या युद्धात हार पत्करावी लागल्यानंतर १९६५च्या युद्धात मोठा विजय मिळविल्याने भारतीय लष्कराने आपली इज्जत परत मिळवली. या युद्धानंतर खर्या अर्थाने भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाने वेग पकडला. याचा परिणाम म्हणून भारतीय लष्कराने १९७१च्या युद्धात निर्णायक विजय मिळवला.

नेतृत्त्व भारत आणि पाकिस्तानचे
भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूनी सैन्याच्या आधुनिकिकरणाकडे पूर्ण दुर्लक्ष केले.१९६५चे युध्द लढले गेले, त्यावेळी भारताकडे जुनाट विमाने होती.पाकिस्तानकडे सेबर जेटसारखी अत्याधुनिक विमाने होती. भारताकडे दुसर्या महायुद्धात वापरण्यात आलेले शेरमन आणि सेंच्यूरीयन हे रणगाडे होते. तर पाकिस्तानकडे अत्याधुनिक ‘पॅटन’ रणगाडे होते.
पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे १९६४ साली निधन झाले. त्यानंतर पंतप्रधान झालेले लालबहादूर शास्त्री यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व  नव्हते. त्यांचा प्रशासकिय अनुभवही  कमी होता. त्यामुळे जेंव्हा पाकिस्तानचे  फिल्डमार्शल आयुबखान लालबहादूर शास्त्रींना भेटले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री हे आमच्याविरोधात काय लढणार असे त्यांना वाटले होते.
 १९६२चे युध्दानंतर निम्मे भारतीय लष्कर चीनच्या सीमेवर पाठविण्यात आले होते. यामुळे काश्मीर आणि पंजाबच्या पाकिस्तानी सीमेवरील सैन्य कमी झाले होते. कच्छच्या वाळवंटात भारतीय सैन्याची संख्या अत्यल्प होती. याचाच फायदा घेऊन पाकिस्तानने हल्ले केले. 
 

 कच्छच्या रणात ‘ऑपरेशन डेझर्ट होक" 
हे युध्द जानेवारी ते सप्टेंबर १९६५ मधे चार वेगवेगळ्या काळात लढले गेले. जानेवारी महिन्यात पाकिस्तानने भारताविरोधात ‘ऑपरेशन डेझर्ट होक कच्छच्या रणात जानेवारीच्या महिन्यामध्ये सुरू झाली.पाकिस्तानच्या १५ ते २० हजार सैन्याने भारतीय चौक्यांवरती तीन  हल्ले केले. ते हल्ले परतवून लावण्याला भारतीय सैन्याला यश मिळाले. यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत घेऊन हे युध्द ३० जूनला थांबविले. 
काश्मीरमध्ये ऑपरेशन जिब्राल्टर 


 

अघोषीत युध्दाच्या पुढचा भाग एप्रिल ते जुलै अशा चार महिन्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरु झाला. याला ऑपरेशन जिब्राल्टर असे म्हणण्यात आले. जनरल अख्तर हुसेन यांनी ३० हजार पाकिस्तानी सैन्याबरोबर टोळीवाल्यांच्या रूपात काश्मीरमध्ये घुसखोरी केली व भारतीय सैन्यावर हल्ले सुरू केले. काश्मिरी जनता भारताविरोधात उभी राहिल्याचे दाखवून काश्मिरी जनतेला मदत करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य काश्मीरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार होते.  
या अघोषित युद्धात भारतीय सैन्याने केलेल्या उत्क्रुष्ट कामगीरीमुळे अनेक पाकिस्तानी सैनिकांना पकडण्यात यश आले. 

मेजर रणजीतसिंग दयाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कमांडोंनी पाकव्याप्त काश्मीरच्या हाजीपिर  या अतिशय खोलवर असलेल्या खिंडीवर हल्ला करून तिथे कब्जा केला. यानंतर जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याने तेथून पळ काढला. 
काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन ग्रँडस्लॅम 
काश्मीरमध्ये अपारंपारीक युध्द करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने जम्मुमधील छांब या भागातील भारतीय सैन्यावर हल्ला केला. छांब भागात झालेल्या लढाईचे नाव ‘ऑपरेशन ग्रँडस्लॅम हे होते. २ सप्टेंबर १९६५ला भारत-पाकिस्तानचे पारंपारीक युध्द सुरु झाले. ६ सप्टेंबरपर्यंत पाकिस्तान सैन्याने छांबवर विजय मिळवून अखनूरच्या दिशेने आगेकुच केली. अखनूर गावावर त्यांना विजय मिळवता असता तर जम्मू-अखनूर-पुंच हा रस्ता कापला गेला असता. यामुळे पुंच राजौरीसारखे जिल्हे पाकिस्तानला भारतापासून वेगळे करता आले असते. यामुळे पाकिस्तानी सैन्याचे आक्रमण थांबविण्याकरता भारतीय लष्कराने हवाई दलाचा वापर करावा असा प्रस्ताव संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे दिला. चव्हाण यांनी केवळ पाच मिनिटांत निर्णय घेऊन भारतीय सैन्याची मदत करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे पाकिस्तानी हल्ला थांबविण्यात भारतीय सैन्याला यश मिळाले.
दुसऱ्या महायुद्धानंतरचे रणगाड्यांमधले सर्वात मोठे युध्द 
अखनूर रस्त्याला धोका असल्याने जनरल हरबक्षसिंग यांनी पाकिस्तानची या भागातील ताकद कमी करण्यासाठी पंजाबमध्ये नविन आघाडी उभारण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांना सांगितले. पंतप्रधानni जगाचा दबाव झुगारून लावत पंजाबमध्ये दुसरी आघाडी उघडण्यासाठी परवानगी दिली. यामुळे स्वांतत्र्यानंतर पहिल्यांदा भारतीय सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून लाहोरच्या दिशेने कुच केले.


 

 
भारतीय सैन्याला वेळीच थांबविले नाही, तर लाहोरसारखे दुसरे सर्वात महत्त्वाचे शहर भारताच्या ताब्यात जाऊ शकते हे फिल्डमार्शल आयुब खान यांना कळून चुकले. त्यामुळे त्यांनी त्या भागात मोठ्या संख्येने रणगाड्यांचा वापर केला. सियालकोट भागामध्ये भारतीय आणि पाकिस्तानी रणगाड्यांमध्ये दुसर्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे युध्द झाले. 

इचोगील कालवा ओलांडून लाहोरपर्यंत पोहोचण्याची कामगीरी ३ जाट  बटालियनने केली.३ जाट बटालियनचे कमांडींग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल हाईड यांना महावीर चक्र प्रदान करण्यात आले. याच भागात पुण्याचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल ए. एस. वैद्य(नंतर सैन्य प्रमुख) यांना महावीर चक्र प्रदान करून गौरविण्यात आले.पुण्याचे दुसरे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल ए. बि तारापोर यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करून गौरविण्यात आले. 
अब्दुल हमीदनी पाकिस्तानचे पाच रणगाडे उद्धवस्त केले
भारतीय सैन्याला लाहोर आणि सियालकोट भागात रोखु शकत नाही हे समजल्यानंतर पाकिस्तानने तिसरी आघाडी उघडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भारताच्या खेमकरण भागात रणगाड्यांच्या मदतीने प्रवेश केला. खेमकरण येथे भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या रणगाड्यांना भारताच्या सीमेत येऊ दिले. यानंतर कालव्यांचे पाणी सोडून चिखल निर्माण करण्यात आला. त्यामुळे हे रणगाडे या भागातील शेतांमध्ये अडकले. त्यांच्यावरती हल्ला करून मोठ्या संख्येने हे ‘पॅटन’ रणगाडे नष्ट करण्यात आले. 
याच भागात ४ ग्रेनेडीयरच्या सी. क्यू. एम. एच. अब्दुल हमीद यांनी एकट्याने पाकिस्तानचे पाच रणगाडे आरसीएल गनच्या मदतीने उद्धवस्त केले. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. असलउतर आणि खेमकरण भागात झालेल्या लढाईला पाकिस्तानच्या ‘पॅटन’ रणगाड्यांची स्मशानभूमी समजले जाते. केवळ धैर्य आणि शौर्याच्या बळावर जुनाट हत्यारे वापरूनही भारतीय सैन्याने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला.

या युद्धात भारताने पाकिस्तानचा १,९२०; तर पाकिस्तानने भारताचा ५५० चौरस किलोमीटर प्रदेश जिंकला, भारताची जीवितहानी २,८६२ आणि पाकिस्तानची ५,८०० एवढी मानली जाते. भारताचे ९७ रणगाडे, तर पाकिस्तानकडे अमेरिकेचे अधिक दर्जेदार ‘पॅटन’ ४५० रणगाडे नष्ट झाले.या युद्धाचे पारडे उत्तरार्धात भारताच्या बाजूनेच झुकले होते, ही वस्तुस्थिती आहे. 
१९६२ साली झालेल्या पराभवामुळे मानहानी सहन कराव्या लागलेल्या भारतीय सैन्याच्या दृष्टीने १९६५चे युध्द महत्त्वाचे आहे. या युद्धात मिळालेल्या विजयामुळे भारतीय सैन्याने आपल्यावरील डाग पुसून काढला. त्यामुळे या युद्धात धारातीर्थी पडलेल्या अधिकारी आणि जवानांना संपूर्ण देशाने मानवंदना दिली पाहिजे.

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.