Mumbai Local Train Update: रविवारी तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्याचा विचार करताय का? तर थांबा आधी रेल्वेचे वेळापत्रक पाहाच. उपनगरीय रेल्वेवर रविवारी तिन्हा मार्गावर मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी 1 डिसेंबर रोजी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नाही.
रविवारी उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेतील काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं नागरिकांनी प्रवास करताना वेळापत्रक पाहूनच करावा, असं अवाहन रेल्वेने केले आहे.
कुठे- सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी- सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत
परिणाम- या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांत थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकापासून डाऊन मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
कुठे - पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी - सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम - ब्लॉक कालावधीत पनवेल/बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाइन सेवा उपलब्ध असेल.
कुठे - मरिन लाइन्स ते माहीम डाऊन धीम्या मार्गावर
कधी - ३० नोव्हेंबर/१ डिसेंबरच्या मध्यरात्री ००.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत
परिणाम - ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि माहीम स्थानकांदरम्यान सर्व डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या डाऊन जलद मार्गावर चालवल्या जातील. त्यामुळे या गाड्या महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड आणि माहीम स्थानकावर थांबणार नाहीत. महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड येथे फलाट उपलब्ध नसल्यामुळे आणि लोअर परळ आणि माहीम स्थानकावरील फलाटांची अपुरी लांबी यामुळे या गाड्या थांबणार नाहीत.