पिंपरी - अजितपर्वाचा अस्त की लक्ष्मणपर्वाची सुरुवात...!

  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महापौर, स्थायी समिती आणि इतर विषय समित्यांच्या निवडणुका पार पडल्या आणि खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सत्तांतराचे वर्तुळ पूर्ण झाले. भाजपच्या सत्तेची सुरुवात झाली..! 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 27, 2017, 04:01 PM IST
पिंपरी  - अजितपर्वाचा अस्त की लक्ष्मणपर्वाची सुरुवात...! title=

कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड :   पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महापौर, स्थायी समिती आणि इतर विषय समित्यांच्या निवडणुका पार पडल्या आणि खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सत्तांतराचे वर्तुळ पूर्ण झाले. भाजपच्या सत्तेची सुरुवात झाली..! 

पिंपरीमध्ये भाजपची सत्ता आल्याने शहराच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार हे उघड गुपित आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झालेत. पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणाची ज्यांना आवड आहे त्यांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झालेत. त्यातला मुख्य प्रश्न म्हणजे अजित पवार यांच्या अजितपर्वाचा शहरात अस्त झाला का,  आणि भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या लक्ष्मण जगताप यांच्या लक्ष्मणपर्वाचा उदय झाला का....? तर याचे उत्तर 'नाही' असेच द्यावे लागेल....! 

'एका जत्रेने बैल म्हातारा होत नाही' ही म्हण ग्रामीण भागात कायम वापरली जाते...! त्याचे सरळ विश्लेषण करायचे झाले तर एक पराभवाने सगळे संपते असं नाही...! पिंपरी चिंचवड मध्ये अजित पर्वाचा अस्त झाला का या प्रश्नाचे उत्तर शोधात असताना ग्रामीण भागातल्या या म्हणीची आठवण ठेवणे गरजेचे आहे... पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार म्हणजे सत्ता हे सरळ समीकरण होते आणि ते समीकरण पराभवामुळे बदलले आहे. पण याचा अर्थ अजित पवार यांचे शहरातले अस्तित्व संपले असे काढणे योग्य होणार नाही.. 

शहरावरचा त्यांचा एक छत्री अंमल संपला असला तरी आज ही शहरात राष्ट्रवादी प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि अनेक स्थानिक बडे नेते अजित पवार यांना मानणारे आहेत. अजित पवार यांच्याकडे विलास लांडे वगळता एक ही बडा नेता नसला तरी आपल्या वार्डात ताकत असलेले अनेक नेते त्यांच्या बरोबर आहेत आणि हीच त्यांची ताकत आहे..

आज राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते महापालिका निवडणुकीत पराभूत झाले आहेत, पण त्यांचा पराभव राष्ट्रवादीच्या नाराजीपेक्षा लोकांना हव्या असलेल्या बदलामुळे तो झालाय ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात भाजपला या यशाची पुनरावृत्ती करता येईल हे कोणी ही छाती ठोक पणे सांगत नाही अगदी भाजपचे नेते ही...त्यामुळे अजित पवार यांची शक्ती घटली असली तरी ती पूर्णपणे संपली असेही नाही. 

मुळात अजित पवार हे राष्ट्रवादीचे राज्याचे नेते आहेत आणि त्यांची राजकीय जाण, त्यांचे राजकीय डावपेच हे पिंपरी चिंचवड च्या कोणत्याही नेत्यापेक्षा सरस आहेत हे सर्वच जण मान्य करतात. पिंपरीमध्ये त्यांची शक्ती कमी झाली असली आणि स्थानिक भाजप नेते सरस ठरले असले तरी ही परिस्थिती कायम राहील असेही नाही. 

भाजपमध्ये अनेक नेत्यांची गर्दी झालीय त्यातला एखादा नेता परत अजित पवारांकडे जाणार नाही याची खात्री ही कोणी देऊ शकत नाही. उलट राज्यस्तरावर राष्ट्रवादीचे दिवस पालटले तर त्याचा थेट परिणाम पिंपरी चिंचवडच्या राजकारणावर होणार आहे. एकूणच काय तर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांची शक्ती घटली हे सत्य असले तरी अजितपर्वाचा अस्त झाला असे नाही.

 आता साहजिकच दुसरा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे शहरात भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाचा म्हणजेच लक्ष्मणपर्वाचा उदय झाला का....? अजितपर्वाचा अस्त झाला नसेल तर लक्ष्मणपर्वाची सुरुवात झाली हे म्हणणे अतिशोयोक्ती ठरणार आहे. पण पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या तोडीचा दुसरा स्थानिक नेता नाही आणि शहराचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना आहे. किंबहुना शहराचे नेतृत्व करण्याची स्थानिक पातळीवर त्यांच्यातच क्षमता आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता खेचून आणत त्यांनी त्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. 
 
 एकीकडे त्यांची ही घौड दौड सुरु असताना त्यांच्या नेतृत्वाचा भाजप मध्येच कस लागणार आहे. मुळात महापालिकेच्या यशामध्ये लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय डावपेचांचा मोठा वाटा असला तरी भाजपशी संलग्न आमदार महेश लांडगे यांचा ही यशामध्ये आपला मोठा वाटा असल्याचा दावा आहे. 
 
 विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी दोघांमध्ये संघर्ष सुरु आहे. एकीकडे हा संघर्ष सुरु असताना जगताप यांना खूषमस्कऱ्यांचा वेढा ही पडला आहे. वास्तविक भाजपच्या विजयामध्ये जगताप यांनी आखलेली रणनीती कारणीभूत असताना जगताप यांच्या भोवतीचे स्वयंघोषित "महायोध्ये" भाजपचा विजय म्हणजे आपल्याच चाणक्य नीतीचा विजय असल्याचे भासवत आहेत. 
 
 भाजप पर्यायाने लक्ष्मण जगताप यांच्यावर या स्वयंघोषित "महायोध्या"चा  नको  तेवढा प्रभाव नाराजीच कारणं आहे.. त्याचा उद्रेक आज ना उद्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जगताप यांनी राष्ट्र्वादीतल्या विरोधी नेत्यांना ही पक्षात घेतले आहे. त्यांच्याशी त्यांचे किती काळ टिकणार हा कळीचा मुद्दा आहे.

 एकूणच महापालिका निवडणुकीच्या यशाचे शिल्पकार ठरलेल्या जगताप यांना शहरात पर्याय नाही पण त्याचा अर्थ लक्ष्मणपर्वाची सुरुवात झाली असेही नाही. 
 
 एकूणच शहराच्या राजकारणाची सध्याची स्थिती म्हणजे "अजितपर्वा"चा अस्त आणि "लक्ष्मण"पर्वाच्या उदयाच्या मध्यावर आहे...! त्यात कोण बाजी मारतोय त्याचेच पर्व आगामी काळात सुरु होणार....!