... खरंच अशानं देव सापडतो का?

आपले आई, वडील, आजी, आजोबा म्हणतात 'या पिढीचं काही खरं नाही, येणारा काळ कठीण आहे’… तेव्हा त्यांच्यासाठी ते सौम्य वेदना देणारं असतं. परंतु जेव्हा माझ्यासारखा एक २० वर्षीय तरुण या अशा मनस्थितीतून जातो, तेव्हा त्याच्यासाठी ही खूप तीव्र वेदना असते. त्याची कारण अनेक आहेत. 

Updated: Oct 30, 2014, 04:47 PM IST


समीर पाटणकर

समीर पाटणकर, विद्यार्थी

गणपती आणि मी हे एवढं अतूट नातं आहे की, नक्की काय काय लिहू? व्यक्त करू? कोणत्या बाजूने ही पोस्ट मांडू हेच कळत नाहीये. त्यामुळे आत्ता जसं जसं मनात येईल तसं लिहित जातोय!

आमच्या घरी पूर्वापारचा गणपती... त्यात तो दीड दिवसांचा! २०१० वर्षापर्यंत तो खऱ्या अर्थाने दीड दिवसांचा होता! २०११ साली ‘ऋषिपंचमी’च्या (गणेशचतुर्थीच्या पुढचा दिवस) दिवशी माझ्या बाबांचं निधन झालं! २०११ पासून तसा तो एका दिवसाचाच झाला घरच्यांसाठी… माझ्यासाठी तर तो अर्ध्या दिवसाचाच झालाय. कारण पहिल्या दिवशी गणपती पूजा सांगायला जायचं, दुसऱ्यादिवशी बाबांचं श्राद्ध... त्यामुळे माझ्यासाठी फक्त अर्धा दिवस... आजचा हा दिवस बाबांच्या तिसऱ्या वर्षश्राद्धाचा गणपती म्हटलं की बाबांचं नाव तोंडात येणं, डोक्यात विचार येणं, लोकांनी बाबांविषयीच्या आठवणी सांगणं हे आलंच... बाबा, गणपती व मी या विषयावर लिहायला गेलो तर त्याची एक स्वतंत्र ब्लॉग बनेल.

आजचा ब्लॉग लिहण्यामागे उद्देश वेगळा आहे. अनेकांनी मला बदलत चाललेल्या आपल्या उत्सवांविषयी बोलून दाखवलं, चीड व्यक्त केली... समीर तुझं मत काय? असंही विचारलं... प्रत्येकाला हे सगळं ‘एक्सप्लेन’ करत बसणं शक्य नाही... सो या ब्लॉगद्वारे मी माझी मत मांडतोय!

देव देव्हाऱ्यात नाही, माणसांत आहे, ही उक्ती किती खरी आहे, हे आज प्रकर्षाने जाणवतंय. उत्सवांचे बदलत चाललेले स्वरूप बघवत नाही. मनाला प्रचंड वेदना होतात. आपले आई, वडील, आजी, आजोबा म्हणतात 'या पिढीचं काही खरं नाही, येणारा काळ कठीण आहे’… तेव्हा त्यांच्यासाठी ते सौम्य वेदना देणारं असतं. परंतु जेव्हा माझ्यासारखा एक २० वर्षीय तरुण या अशा मनस्थितीतून जातो, तेव्हा त्याच्यासाठी ही खूप तीव्र वेदना असते. त्याची कारण अनेक आहेत. 

उदाहरणच द्यायचं झालं तर, वयं... मुळात वयाचं असं आहे की जे, अगदी कमीही नाही आणि अगदी जास्तही नाही. त्यामुळे आपल्याला या सगळ्यांतूनच जायचंय, अजून येणारा काळ अगदी भीषण आणि खूप कठीण असणार आहे... आणि तो काळ मला व आमच्या या ‘सो कॉल्ड मॉडर्न’ पिढीला बघावा लागणार यात शंकाच नाही. 


प्रातिनिधिक फोटो

आपल्या या परंपरा, तऱ्हा, चालीरीती आपल्या सगळ्यांच्यात एवढ्या भिनल्या आहेत, की काही विचारू नका… आणि हो मी कोणी ‘अंनिस’चा (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) कार्यकर्ता नाही किंवा नास्तिकही (Atheist) नाही. कोणत्याही विचारांच्या लोकांना झोडू इच्छित नाही... बरं बरेचसे लोकं हे उत्सव, देव-देवतांचे उपास-तापास श्रद्धेपोटी न करता भीतीपोटी करत आहेत... बरं आपल्याला असं वागायलाही काही प्रकारचे लोक प्रवृत्त करतात. ‘तुला मोक्ष मिळणार नाही, पुण्य मिळणार नाही’ या भीतीपोटी या सगळ्या गोष्टी फोफावतात. याचा मलाही अनुभव आलाय. असो... यावर बोलायला गेलो तर विषय भरकटेल. 

मी जसं जसं या सगळ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतोय तसंतसं अजून आत ओढला जातोय आणि मग यामुळे लोकांशी खटके उडणं, मत-भेद होणं सुरूच राहतं… गणपती उत्सवाचं बदलतं हे स्वरूप भयावह आणि नैराश्य आणणारं आहे. 

आणि मग म्हणायची वेळ येते - People Wake Up! The meaning of "Yathashakti" (in our Puja's) has changed now! 

फार न लांबवता कालचा घडलेला प्रसंग सांगतो आणि ब्लॉग संपवतो. आईने काल एक गोष्ट सांगितली. आमच्या इथे टिळक चौकात एक बाई केळीची पानं विकत बसलेली. ती माथेरान जवळच्या गावातून ही पानं विकण्यास इथं आलेली... आईने विचारपूस केल्यानंतर आईला असं लक्षात आलं की, ती दिवसभर वडा-पाव आणि तत्सम पदार्थांवर आहे. त्यामुळे आईने घरी येऊन पोळी-भाजी, लोणचं घेतलं आणि तिला दिलं... हा प्रसंग आईने जेव्हा सांगितला तेव्हा त्या बाईच्या चेहऱ्यावर काय आनंद आला असेल, हे चित्र डोळ्यासमोर आलं. यातून सांगायचा मुद्दा हाच, इथे मला खरं गणपती दर्शन झालं. 

आणि मग कधी कधी ओरडून सांगावसं वाटतं… आई तुझं हे वागणं, कर्म पाहिलंस का? अगं वेडे तुझ्यातच देव आहे. बाहेर, इतरत्र का शोधते आहेस? बहुधा बाप्पालाही हेच अपेक्षित आहे. म्हणून तर ती बुद्धीची देवता आहे. अशी बुद्धी सगळ्यांना बाप्पाने देवो! 

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!!!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.