उद्धारली कोटी कुळे...

(लक्ष्मीकांत रुईकर, झी २४ तास) उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे या भीमगीताची आठवण व्हावी, असं वातावरण आज बीड शहरात आलेल्या निळ्या वादळाने आली,निमित्त होत दलित ऐक्य महामोर्चाचे, ऍट्रॉसिटी रद्द करू नये उलट अधिक कडक कायदा करावा, यासह मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी आज बीडमध्ये महामोर्चाचे आयोजन केले होते.

Updated: Oct 16, 2016, 12:54 PM IST
उद्धारली कोटी कुळे... title=

बीड : (लक्ष्मीकांत रुईकर, झी २४ तास) उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे या भीमगीताची आठवण व्हावी, असं वातावरण आज बीड शहरात आलेल्या निळ्या वादळाने आली,निमित्त होत दलित ऐक्य महामोर्चाचे, ऍट्रॉसिटी रद्द करू नये उलट अधिक कडक कायदा करावा, यासह मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी आज बीडमध्ये महामोर्चाचे आयोजन केले होते.

सहसा भीमसैनिक म्हटलं की बेंबीच्या देठापासून दिल्या जाणाऱ्या घोषणा, गगनभेदी आवाज असे वातावरण डोळ्यासमोर दिसते मात्र बीड च्या या मोर्चात शिस्त,शांतता आणि स्वच्छता यांचा अनोखा मिलाफ पाहायला मिळाला.

मराठा क्रांती मोर्चा नंतर बीड मध्ये होणाऱ्या दलित महामोर्चा कडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या,हा प्रतिमोर्चा आहे अशी देखील टीका काहींनी केली मात्र या टिकाकारांची थोबाड मोर्चेकऱ्यांनी फोडली.आमचा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही तर आमच्या न्याय्य हक्कासाठी आहे हेच या जमावाने दाखवून दिले.

प्रज्ञा शील करुणा या त्रिसूत्री चा अनोखा संगम यावेळी पाहायला मिळाला,लाखोंच्या संख्येने जमलेले दलित बांधव,भगिनी,मुली यांनी अत्यन्त शिस्तबद्ध पद्धतीने आपला आवाज सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका ,संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मौलिक सल्ला दिला होता त्याचा अवलंब या मोर्चेकऱ्यांनी केल्याचं दिसून आलं.

सकाळी आठ नऊ वाजेपासून जिल्हा स्टेडियम च्या मैदानावर हातात निळे झेंडे,डोक्यावर निळ्या टोप्या,पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले लोकांचे जथेच्या जथे जमा होत होते,कोणीही घोषणा देऊ नयेत,गडबड करू नये,एकमेकाला मदत करा अशा सूचना दिल्या जात होत्या,मोठ्या संख्येने लोक जमा होणार ,म्हणून पोलीस प्रशासन देखील तणावात होते, मात्र शांतत्तेत मोर्चा संपन्न झाला आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.

मागील साठ सत्तर वर्षात दलित समाजाने किती सहन केले आहे,आक्रोश काय असतो ते या मोर्चात आलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होत,खरोखर दृष्ट लागावी असाच हा मोर्चा होता.

विशेष म्हणजे या मोर्चात ग्रामीण भागातील महिलांची उपस्थिती लक्षणीय अशीच होती,घरच खायचं अन लष्कराच्या भाकरी भाजायच्या अशीच अवस्था या लोकांची आजवर होती.

प्रत्येक पक्ष असो की संघटना दलित समाजाकडे केवळ व्होट बँक म्हणूनच पाहिलं गेलं आहे, गेल्या सत्तर वर्षात या समाजात फार काही बदल झालेला नाही किंवा तथाकथित समाजाच्या ठेकेदारांनी केला नाही,मात्र आजच्या घडीला या समाजाला आपल्या हक्काची जाणीव होऊ लागली आहे.

संघर्ष पाचवीलाच पुजलेल्या या समाजाने प्रत्येक गोष्ट संघर्षातूनच मिळवली आहे,मग ते मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर असो की गायरान जमिनींवरील ताबा,प्रत्येक वेळी समाजाला रस्त्यावरच उतरावे लागले आहे, अनेक वर्षे गावकुसाबाहेर या समाजाला ठेवण्यात अनेकांनी धन्यता मानली आहे.

आज कुठे तरी समाजातील लोकांना आपल्या हक्काची जाणीव झाली आणि त्यांनी वादळ रस्त्यावर उतरवलं, सहसा हा समाज केवळ आंबेडकर जयंती किंवा नामांतर दिन या दिवशीच एकत्रित आलेला पाहायला मिळाला आहे.

एरवी एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज रस्त्यावर आणायचा म्हटलं तर लाखो रुपये खर्च होतील,मात्र आज मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी मनातून आपला सहभाग नोंदवला असे दिसून आले.

निव्वळ गावागावातून लोक घरच कार्य असल्यासारखे मोर्चात सहभागी झाले होते,कोठेही काहीही अनुचित घडणार नाही यासाठी स्वयंसेवकांची मोठी फळी रस्त्यावर तैनात होती,विशेष म्हणजे आलेल्या लोकांमुळे इतर कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली गेली.

कुठलीही गोष्ट जास्त काळ साठवली कि कुजते आणि पेरली तर रुजते असे म्हणतात त्याच पद्धतीने आजच्या मोर्चाच्या माध्यमातून दलित समाजाने एक व्यापक विचार रुजवण्याचा प्रयत्न केला आहे,त्यांच्या या विचाराचे पीक निश्चितपणे सर्व समाजाचे भले करेल यात शंका नाही.

शेवटी काय संघटन हे काळाची गरज असते हे नेहमीच सिद्ध झालं आहे,मात्र या संघटनाला योग्य दिशा मिळणे आवश्यक असते ,येणाऱ्या काळात या समाजाच्या संघटनाला यश मिळेल हीच अपेक्षा .