हे दंगलखोर नेमके कोण असतात?

मनात चांगले विचार रूजवले नाहीत, म्हणजेच. 

Updated: Feb 21, 2016, 04:24 PM IST
हे दंगलखोर नेमके कोण असतात? title=

मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास) दंगलीत शहरं पेटवली जातात, टायर काय, वाहनं काय उभी जिवंत माणसं जाळली जातात. लोढेंच्या लोंढे माणसांवर तुटून पडतात, अनेक निष्पाप मारले जातात. कुणाचे तरी बाबा, आई, मुलगा किंवा मुलगी कायमचे संपलेले असतात, याचा त्यांच्या जीवनावर नक्कीच कायमचा वाईट परिणाम होतो.

वाहनं आणि खासगी संपत्ती जाळल्यावरही नुकसान राष्ट्राचंच होतं. राष्ट्रध्वजाला सलामी देताना सर्वच अभिमानानं सलामी देतात. मग हे दंगलखोर कोण असतात? जे सर्व राष्ट्रचं संपवायला निघाल्यासारखे वागू लागतात.

दगडफेकीत पोलिसांना जखमी करणारे हे कोण असतात? अनेक आंदोलन करताना जमाव हिंसक झाल्याने, चांगल्या उद्देशाने आणि भूमिकेने आलेले आंदोलकही अनेक वेळा मारले जातात.

पण जमाव हिंसक करणारे, मॉबचा चेहरा असणारे, पण क्षणात चेहरा धुसर झाल्यासारखे गायब होणारे, हे दंगलखोर कोण असतात?.

तर हे दंगलखोर फार कमी वयातले असतात. दंगलखोरांमध्ये १८ ते २८ वर्ष वयोगटातील सर्वात जास्त मुलांचा समावेश असतो.

या वयोगटाचा फायदा अनेक राजकीय पक्ष, संघटना आणि नेते घेतात. हे वय म्हणजे सळसळणारं, क्रांतीकारी मन असणारं असतं. थोडंसही छेडलेलं, अथवा मनाला न पटणारं, थोडा वेळंही सहन न करणारं हे वय असतं. या वयात त्यांच्या विचारांना योग्य दिशा दिली तर ते, देशासाठी किंवा आपल्या करिअरमध्ये नक्कीचं क्रांतीकारी कार्य करू शकतात.

मात्र या वयात त्यांच्या मनात चांगले विचार रूजवले नाहीत, म्हणजेच राष्ट्रप्रेमाचे विचार पोहोचले नाहीत, तर हे दगडखोर म्हणजेच दंगलखोर तयार होतात. 

या वयात आपला मुलगा आणि मुलगी आपल्या देशाविषयी किंवा कोणत्या पक्ष संघटनेविषयी काय विचार करतो, तो नको त्या मुद्यांवर, आमिषावर आक्रमक होतोय का? हे पाहणं देखील पाल्यांचं काम असतं. 

तो घातक विचारांचा झेंडा, आपल्या खांद्यावर घेत असेल, तर त्याला त्या पक्ष संघटनांचे विचार सांगण्याची गरज असते. हे अतिशय निष्पक्षपणे सांगण्याची गरज असते, कारण चांगल्या विचारांवरच राष्ट्र अधिक खंबीर होत असतं, जगातील कोणत्याही धर्मापेक्षा, नेहमीच आपलं राष्ट्रमोठं असतं, हे सांगण्याची नितांत गरज असणार ते वय असतं.