घुमान डायरी : मुंबई-घुमान-मुंबई

घुमानकडे निघालो आहे. घुमान इथे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरते आहे... 

Updated: Apr 7, 2015, 07:22 PM IST

 

 

 

    ब-याच वर्षांनंतर रेल्वेने जवळपास पन्नास तासांहून जास्त प्रवास करतोय...परतीचा प्रवास धरुन शंभरहून जास्त तासांचा प्रवास होणार...पुलंच्या काही अप काही डाऊनचा पुन्हा अनुभव! छोटी छोटी गावे आणि इंग्रजांच्या काळातल्या दगडी इमारती...काही ठिकाणी ओसाडवाडी तर काही ठिकाणी शेतांमधली टुमदार घरे....विमानाने प्रवास केल्यानंतर ट्रान्सफर सिनसारखं आपण लगेच दुस-या वातावरणात थेट प्रवेश करतो. पण रेल्वेचा प्रवास म्हणजे स्लो डिझॉल ! हळूहळू रंगत जाणारा किंवा कधी रेंगाळणाराही बडा ख्याल.....वातावरणातले बदलही तुमची मनस्थिती बदलवत राहतात....आपण एकाच जागी बसलेले असुनही धावते असतो...रेल्वेच्या गतीबरोबर स्वत:शी संवादही साधता येतो...खिडकीबाहेर गावाकडची संध्याकाळ दिसते आहे...ही गोधुलीची वेळ यावेळी जनावरे घराकडे परततात...त्यांच्या गळ्यातल्या घंट्यांचा लहानपणी ऐकलेला आवाज अजून कानात साठवला गेलाय...

     

    1 एप्रिल 00.00 छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई

    घुमानकडे निघालो आहे. घुमान इथे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरते आहे. 

    त्यासाठी खास रेल्वेगाडी मध्यरात्री सुटणार आहे. पण ती गाडी अजून आलेलीच नाही. कुठल्या फलाटावर येणार तेही नक्की नाही.. साहित्य संमेलनाला जाण्यासाठी साहित्यप्रेमी जमलेत, पण गाडी अद्याप लागलेली नाही. घुमान आहे पंजाबमधील गुरुदासपूर जिल्हातील १२ हजार लोकवस्तीचे गाव. संत नामदेव भागवत धर्माची पताका घेऊन पंजाबात गेले तेव्हा त्यांनी याच गावात राहून तप केलं आणि समाजप्रबोधनाचं काम केलं. गुरुग्रंथसाहिबमध्ये नामदेवांची ६१ पदं आहेत.. त्यांच्या नावाचा गुरुव्दाराही इथं आहे. आपले संत नामदेव पंजाबात बाबा नामदेव नावानं ओळखले जातात गुरु नानक देवांच्या आधी दोनशे वर्ष आधी पंजाबात संत नामदेवांनी  काम केलं. १२७० ते १३५० हा संत नामदेवांचा काळ. संत नामदेवांची कर्मभूमि असलेल्या घुमानमध्ये साहित्य संमेलन होत असल्यानं साहित्य रसिकांमध्ये उत्सुकता आहे.

    १ एप्रिल ००.३० छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई

    घुमानसाठी विशेष गाडी अद्याप आलेली नाही..ह्या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्री गिरिष बापट आलेत. तेही ताटकळत बसलेत. 

    रेल्वेकडून एकंदर अनास्थाचाच साहित्य रसिकांनी जिथे मिळेल तिथे जागा पकडल्या आहेत. गाडी अखेर पंधरा क्रमांकाच्या फलाटावर लागणार हे नक्की झाले आहे, पण कधी येणार हे रहस्य कायम आहे. जमलेल्या साहित्य प्रेमींशी थोडया गप्पा मारल्या. संत नामदेवांबद्दल अनेकांना आकर्षण आहे. शूल्क भरुन हे साहित्यप्रेमी २४-२५ तासांचा रेल्वे प्रवास करुन घुमानला  जाताहेत. नामदेव प्रवासाची आधुनिक साधनं नसतांना पंजाबात गेले आपण रेल्वेनं तरी जायला काय हरकत आहे, एकानं दिलेली प्रतिक्रिया.

    १ एप्रिल २.०० – घुमानला जाणारी गाडी अद्यापही आलेली नाही. हिरवी झेंडी दाखवायला आलेले मंत्री कुठे दिसत नाहीत. तेही कंटाळलेत. गाडी उशीरा निघाली तर कधी पोहोचणार याची साहित्यप्रेमींना आता चिंता वाटून राहिली आहे. अखेर फलाटावर गाडी येते. ना फुलांची सजावट ना काही. फक्त साहित्यिकांची नावे डब्याला  दिलेली. साहित्यप्रेमी आणि स्वयंसेवक पटकन गाडीत चढताहेत. अखेर घुमान दिंडी निघाली आहे...

    १ एप्रिल २.२० – अखेर विशेष रेल्वे गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन निघाली 
    आहे. चलो घुमान ! गाडीला उशीर झाल्यानं घाईघाईत साहित्यप्रेमी गाडीत चढलेत. 
    कंटाळलेले मंत्री कुठे गेले ते गर्दित दिसलेच नाही. मंत्र्यांसोबत लवाजमा नव्हता की 
    पोलिस फाटा नव्हता. बहुदा कंटाळून गेले असावेत.

    १ एप्रिल सकाळचे सात, कर्जत – मजल दरमजल करत घुमान संमेलनाची विशेष 
    गुरुनानकदेव विशेष रेल्वे  गाडी अखेर कर्जतला पोहोचली आहे, मुंबईहून निघालेले 
    साहित्यप्रेमींनी मिळेल तशी झोप घेण्याचा प्रयत्न केलाय. कर्जतला नवे इंजिन लागते आहे. 

    १ एप्रिल सकाळचे आठ – एक्सप्रेसवे झाल्यापासून पुण्याला रेल्वेने जाण्याचे प्रसंग कमी होत गेले. खिडकीतून खंडाळा लोणावळ्याच्या निसर्गाचा आनंद घेत पुढे चाललोय. 

    लोणावळ्याला गाडी पोहोचली ती आठच्या सुमारास. नंतर लागलं ते निसर्गरम्य कामशेत. पुणेकर साहित्यप्रेमी मात्र गाडीची वाट पाहून मात्र कंटाळलेत. मुंबईहून 
    सुटलेली ही गुरु नानकदेव एक्सप्रेस पुण्याला सकाळी पाचला पोहोचणार होती. त्यामुळं 

    साडेचारपासून साहित्यप्रेमी पुणे स्टेशनवर जमले होते. पण गाडीला चार-पाच तास उशीर झालाय. 

    सकाळचे पावणे दहा, पुणे स्टेशन – अखेर एकदाची गुरु नानकदेव एक्सप्रेस ही घुमान साहित्य संमेलनाची विशेष रेल्वे गाडी पुणे स्टेशनात पोहोचली. गाडीचं पारंपारिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. आता पुढचा प्रवास.

    सकाळचे ११.३० – गाडी थांबलीय. कुठे थांबली ते कळत नाही. गाडी आता अहमदनगरच्या दिशेनं निघालीय. नंतर मनमाड. आजुबाजुला उसाची शेती दिसतेय. गाडीत आता मुंबई आणि पुण्यातले साहित्यप्रेमी आता स्थिरस्थावर झालेत. चहा नाश्ता झालाय. बहुतेक जणं चाळीशीच्या पुढे. पण काही तरुण-मुलामुलींचे गटही दिसताहेत. काही वारकरीही आहेत. 

    गप्पा रंगताहेत. कुणी आवडत्या साहित्याबद्दल बोलते आहे तर कुणी नामदेवांबद्दल. नामदेवांच्या ओढीनं पांढरा सदरा पायजमा आणि टोपी घातलेले वारकरीही घुमानला  निघालेत. गुरु नानकदेव एक्सप्रेस बियासला बहुदा दोन एप्रिललला सकाळी पोहोचणार असं दिसतयं त्यामुळं आता लांबच्या प्रवासाची तयारी करत कुणी डुलकीही घेताहेत. एकंदर गाडीचा प्रवास रमतगमतच चाललायं.


    रेल्वेचा प्रवास

     

    २ एप्रिल २०१५, सकाळी ७.०० वाजता
    गाडी रात्रभर पळतेच आहे. गाडीनं आता वेग घेतलाय. मध्यप्रदेशात आता प्रवेश केलाय. दोन्ही बाजुंनी गव्हाची शेती दिसतेय. 

     

    २ एप्रिल २०१५, दुपारी ११.०० वाजता
    झाशीच्या राणीच्या 'झाशी'नंतर आता शिंदेंचे ग्वाल्हेर... बैठी विटांची घरं आजुबाजुला दिसायला लागलीत. आता तर मातीही पांढरी होताना दिसतेय. घुमानचे वारकरी आता गाडीनं वेग घेतल्यानं सुखावलेत. रात्री बियास, मग अमृतसर... आणि उद्या सकाळी घुमान... स्टेशन आलं की सेल्फी आणि फोटोजचं सेशन सुरू होतं... गाडीत वाचन, गप्पा आणि भजन... बहुतेक जणांची आता बैठक जमलीय. ग्रुप तयार झालेत. फारसा उकाडा काही जाणवत नाहीय. त्यामुळे आता ग्वाल्हेरनंतर जेवण आणि मग डुलकी घेण्याची तयारी...

    2 एप्रिल संध्याकाळचे पाच -

    हरियाणात आजची संध्याकाळ. दिल्ली आता जवळ आली आहे. पुन्हा गव्हाची शेतं लागताहेत. उभा आडवा पसरलेला आपला देश. त्याची कल्पना बसल्या जागी येत नाही. ट्रेनमध्ये पंजाबीचे धडे दिले जाताहेत. संमेलनावरही पंजाबी छाप असणार आहे. तुसी किद्दा हो? मै ठिक हां ! तुहांन्नु संमेलन किद्दा लग्गा? मैनु संमेलन अच्छा लग्गा! एवढी किमान पंजाबी आता येते आहे... तुसी मेरे घर आईओ! एवढं तरी घुमीनवासियांना सांगता येईल!

     

    2 एप्रिल 2015 वेळ रात्रीची 8.30 - 

    दिल्लीच्या बाहेरुन आता बियासकडे प्रवास. दिल्लीजवळ येताच भुरटया चोरांपासून सावध राहण्याच्या सुचना!  एकंदर दिल्लीच्या संस्कृतीची ओळखच!  आता बियास मग अमृतसर आणि मग घुमान!

    ३ एप्रिल - सकाळी ६.३० वाजता
    लुधियानात सकाळ होतेय... वातावरण पावसाळी... आज घुमान साहित्य संमेलनाचे उद्धाटन होणार आहे पण अद्यापही घुमानचे दर्शन नाही. पन्नास तासांहून जास्त प्रवास झाल्याने सगळे आंबलेत. कधी हा प्रवास संपतोय, असं झालंय.  


    पंजाबमध्ये दाखल

    ३ एप्रिल  : सकाळी ९ वाजता 

    पंजाबची कष्टानं मिळवलेली संपन्नता दिसते आहे... भरात आलेली गव्हाची शेते आणि आलिशान बंगले. लुधियानानंतर लागली सतलज... पाणी कमी होतं. झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज म्हणजे पंजाब... सतलजचे दर्शन झाले... आता बियासचेही होईल... पण, घुमानला कधी पोहोचणार हा प्रश्नच आहे. साहित्यप्रेमीच न पोहोचल्यामुळं साहित्य संमेलनाचे वेळापत्रकही बदलण्यात आलं आहे. आता सकाळी ९.०० ऐवजी दुपारी दोन वाजता कार्यक्रम सुरु होणार आहे. 


    घुमान संमेलन स्थळ

    3 एप्रिल सकाळचे दहा

    अखेर बियासला पोहोचलो. वातावरणात थोडी थंडी. प्रवास करुन आंबलेले साहित्य प्रेमी एकदाचा प्रवास संपल्याच्या आनंदात आहेत. फलाटावर पंजाब सरकारचे प्रतिनिधी स्वागतासाठी आहेत. राहण्याची  व्यवस्था अमृतसरला केली आहे. पण आम्ही आधी थेट घुमानला जाण्याचा निर्णय घेतला. बियास स्टेशन स्वच्छ आहे.. बियास नदीबद्दल भूगोलाच्या पुस्तकात वाचले होते, आता बियासला आलो आहे. थकवा मागे सारत उत्साहात स्टेशनबाहेर पडलो. टॅक्सी केली, सगळे  सामान टपावर आणि गाडित ठेवले, पंजाबी ड्रायव्हर उत्साही होता. गव्हाच्या शेतातून गाडी पळू लागली. काही हिरवी तर काही पिवळी गव्हाची शेते. शेतांमध्ये बंगले.

    ३ एप्रिल सकाळचे ११

    घुमान गावाच्या वेशीवर स्वागताची कमान. गावातही स्वागताची जय्यत तयारी. सगळीकडे पंजाबी आणि मराठीत साहित्य संमेलनाचे फलक. मराठी माणसे गावात फिरतांना दिसताहेत. घुमान एक छोटेसे गाव. बैठी दुमजली घरे. गावात पक्के रस्ते. आजुबाजुला गव्हाची शेते. टॅक्सी सोडून आम्ही शिरोमणी बाबा नामदेव गुरुव्दाराकडे निघालो. संत नामदेवांनी इथेच देह ठेवला असं पंजाबात मानलं जातं. त्यांच्याच नावाचा हा गुरुव्दारा. गुरुव्दारा माणसांनी गजबजून गेलेला. सगळीकडे पताकांची सजावट. स्थानिक नागरिक स्वागत करताहेत. गुरुव्दारात आलेल्यांची सगळी व्यवस्था. तयार होऊन बाहेर पडलो.

    ३ एप्रिल दुपारी १

    साहित्य संमेलन एका स्टेडियममध्ये. संत नामदेव नगरी असं या परिसराला नाव दिले आहे. मंडपातही गर्दी. महाराष्ट्रातून आलेले साहित्यप्रेमी उत्साहात पंजाब सरकारनं केलेल्या तयारीकडे पाहताहेत. पंजाब सरकारनं सगळी व्यवस्था चोख केलेली. पंजाब प्रशासनाचे अधिकारी काही अडचण आली  तर लगेच मदतीला येताहेत. पंजाब पोलिस सुरक्षा व्यवस्थेवर नजर ठेवून आहेत. भव्य मंडप. मोठे स्टेज. वारकरी आणि संत नामदेवांचे  भक्तही मोठ्या प्रमाणात  आलेत. साहित्यप्रेमींच्या मुलाखती आणि तयारीवर लाईव्ह रिपोर्टिंग केलं. चंडिगडहून झीची ओबी व्हॅनही आली  आहे. व्हॅनसोबत ओबी इंजिनियर आणि ड्रायव्हर जवळपास दररोज ओबीतच राहताहेत. पाच राज्यांमध्ये त्यांची सतत भटकंती सुरु असते.

    उद्घाटन सोहळ्याला संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, शरद पवार, नितीन गडकरी यांची भाषणे. ज्ञानपिठ विजेते पंजाबी लेखक गुरुदयालसिंग येणार होते पण ते आलेले नाहित. आजारी असल्याचे कळते.


    मीडिया कक्ष

    ३ एप्रिल संध्याकाळचे पाच

    उद्घाटन सोहळा संपलाय. लक्षात राहिलं ते पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांचे भाषण. बादल बातम्यांमधून भेटलेले. आता प्रत्यक्ष पाहिले. खास रांगडया पंजाबीत त्यांनी महाराष्ट्र आणि पंजाबचं नातं उलगडून दाखवलं. आपल्याला साहित्यातलं फारसं कळत नाही पण तुम्ही दरवर्षी या असं आमंत्रणच त्यांनी साहित्यप्रेमींना दिलं. बादल पंजाबी लहेज्यातल्या हिंदीत बोलत होते. भारतीय भाषांना एक गोडवा आहे तो त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता. काही मागण्याही केंद्रातल्या नेत्यांकडून मंजूर करुन घेतल्या, संत नामदेवांनी इथल्या लोकांच्या मनात किती मोठं स्थान मिळवलं आहे याचा प्रत्यय येतो आहे. घुमानचे गावकरी अतिशय़ आदराने त्यांचा उल्लेख करतात. घुमान गाव साहित्य संमेलनामुळं चर्चेत आलं आहे. स्थानिक बातम्यांमध्येही घुमानचीची चर्चा आहे. घुमानला आता कॉलेजही सुरु होतेय. मंडपात फारसे साहित्यिक दिसत नाहित. बाहेर लेखक राजन खान भेटले. कार्यक्रम पत्रिकेत दम नाही असा अभिप्राय त्यांनी दिला. मोठा मंडप. त्यात व्यवस्थित केलेली बसण्याची व्यवस्था.

    ३ एप्रिल संध्याकाळचे 8

    उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर अमृतसर कडे निघालो. अर्धा पाऊण तासाचा प्रवास. अमृतसर म्हणजे आपल्या कोल्हापूरसारखे शहर. अर्धे इतिहासात तर अर्धे आधुनिक वातावरणात. मदनलाल धिंग्रा, भगतसिंह, जालियनवाला बाग, सुवर्णं मंदिर, पराठे, कबाब आणि लस्सी म्हणजे अमृतसर. शेतांमधून जाणारा रस्तात पार करत अमृतसरकडे निघालो.

    ३ एप्रिल रात्रीचे ११

    हॉटेल ४२ मध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. मॉलरोडवचे हे हॉटेल. उशिर झाल्यामुळं रुमवरच जेवण मागवले. पंजाबी चव महाराष्ट्रात मिळणा-या पंजाबी पदार्थांपेक्षा वेगळी आहे. मसाले तिखट नाहित पण चवदार आहेत. रोटीही चांगली. मुख्य म्हणजे पोटाला काहाही त्रास होत नाही.

    ४ एप्रिल सकाळचे 8

    तयारी करुन घुमानकडे निघालो. अमृतसरमध्ये उंच इमारती नाहित. जुन्या इमारती एक किंवा दोन मजली तर नव्या इमारती तीन ते चार मजली. मध्येच मॉल, मॅकडोनाल्ड, केएफसी...गावात अजुनही सायकल रिक्षा, बँटरीवर चालणा-या आणि नेहमीच्या रिक्षाही दिसताहेत. आधुनिक गाडयाही आहेतच. एकाचवेळी सायकल आणि स्कॉर्पिओही शेजारीशेजारी दिसताहेत. गावात मोठया रस्त्यांबरोबरच छोटया छोटया गल्ल्या आणि त्यातून वाट काढत सुरु असलेली वाहतूक.


    Caption

    ४ एप्रिल सकाळचे १०

    गाडी गव्हाच्या शेतांमधून घुमानकडे निघाली आहे. शेतांमध्ये टोलेजंग बंगले. पंजाबचा शेतकरी कष्टाळू आहे. पण बदलत्या हवामानामुळे तोही हादरलाय, गहू अद्याप कापणीवर आलेला नाही त्यामुळं गहू खरेदी उशिरा सुरु होणार आहे. गहू सोडून दुसरे पिक दिसत नाही. शेती सपाट.. लांब लांब पसरलेली शेती. मध्येच मोटरसायकलवर शेतातून जाणारा शेतकरी.


    गाडी गव्हाच्या शेतांमधून घुमानकडे निघाली आहे

    ४ एप्रिल सकाळचे ११

    घुमान गावात उत्साह. साहित्यप्रेमींबरोबरच स्थानिक घुमानवासीही कार्यक्रमांना हजेरी लावताहेत. मध्ये मोठा मंडप. एका बाजुला पुस्तकांचे स्टॉल्स. दुसरीकडे भोजनव्यवस्था. आज घुमान गावात फिरलो. गुरु बाबा नामदेव गुरुव्दाराजवळ घुमानचे सरपंच भेटले. त्यांनी गुरुद्वाराबद्दल माहिती दिली. संत नामदेव गुरुव्दारात हिंदू, शिख आणि इस्लाम अशा तिन धर्मांचा प्रभाव  दिसतो. पंजाबीत विठ्ठलाला बिठलु म्हणतात... पंजाबी भाषेत गोडवा आहे. समजायला अडचण येत  नाही.


    प्रकाश दांडगे

    ४ एप्रिल दुपारचा १

    साहित्यप्रेमी खरेदी करतांना दिसताहेत.. काही जण पगडीही बांधून घेताहेत. मीही सरदार प्रकाशसिंह झालो पगडी बांधून. घुमान गावात अफलातून लस्सी मिळते. फार घट्ट नाही, फार गोडही नाही आणि फार खारटही नाही. पण जबरदस्त चव. ही लस्सी प्यायल्यावर ताजंतवानं वाटतं. मुंबईत पंजाबी लस्सी प्यायल्यावर जड वाटतं, खऱी पंजाबी लस्सी फक्त पंजाबमध्येच मिळते. मुंबईत मिळते ती मुंबई लस्सी ! पंजाबी समोसाही अफलातून... तिखट नाही पण चवदार !

    ४ एप्रिल दुपारचे ४

    जेवतांना पंजाब आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक एस एस विर्क भेटले. पंजाबमधील दहशतवाद संपण्यात विर्क यांचा मोठा हात होता. यवतमाळमध्ये असतांना भाऊसाहेब पाटणकर यांची झालेली ओळख, पंजाबीसह मराठी साहित्याचं वाचन याबद्दल विर्क बोलले. याच पंजाबच्या भूमीत एकेकाळी दहशतवादानं थैमान घातलं होतं. महाराष्ट्रातून आलेल्या एस. एस. विर्क, ज्युलिओ रिबेरो यांनी हा दहशतवाद संपवण्यात मोठी कामगिरी बजावली. अर्थात दोघेही टीकेचे धनी ठरले. पण पंजाबात आता शांतता आहे हे खरं. भाऊसाहेब पाटणकर यांची गझल-शाहिरीबद्दल पंजाबातला दहशतवाद संपवणारे विर्क घुमानमध्ये भरभरुन बोलत होते. महाराष्ट्र रांगडा-पंजाबी भांगडा कार्यक्रमात एका पंजाबी आयपीएस अधिका-यानं पंजाबी गीत सादर करुन सगळ्यांना खूश करुन टाकलं. पंजाबी भांगडयासोबत नाशिक ढोलही साहित्य संमेलनात मजा आणतो आहे... पण कवि संमेलन फारसे रंगले नाही आणि साहित्यिकही फारसे दिसत नाही. आंध्र प्रदेश

    ४ एप्रिल संध्याकाळचे ८

    घुमानचे गावकरी आणि साहित्यप्रेमी आता एकमेकांमध्ये मिसळून गेलेत. संमेलन यशस्वी होण्यासाठी पंजाब सरकारनं कुठलीही कसर ठेवलेली नाही. स्वत: कलेक्टर सगळीकडे फिरुन व्यवस्था पाहताहेत. वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुरक्षा व्यवस्थेवर नजर ठेवून आहेत. विशेष म्हणजे सुरक्षा व्यवस्थेचा प्रमुख आहे एक मराठी गडी. आयपीएस अधिकारी केतन पाटील हे पंजाब केडरचे आयपीएस अधिकारी सध्या अमृतसरमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त आहेत. त्यांची भेट घेतली. एवढे मराठी माणसे पाहून त्यांना आनंद झाला होता. परत निघालो.

     

    ४ एप्रिल रात्रीचे १०

    पुन्हा हॉटेल 42. आज सुवर्णमंदिराला भेट द्यायची आहे. एक रिक्षावाला थांबवून ठेवला होता. त्याच्यासोबत सुवर्णमंदिराकडे निघालो. सुवर्णमंदिर म्हणजे अमृतसर  मधलं मुख्य आकर्षण. मध्ये हरमंदिर साहिब. भोवती पवित्र तळे, एकाबाजुला अकाल तख्त आणि चहुबाजुकडे परिक्रमा. छोटया छोटया गल्लांमधून सुवर्ण मंदिरात  पोहोचले.


    सुवर्ण मंदिर

    ५ एप्रिल ००.००

    मध्यरात्री सुवर्णमंदिर झळाळून निघाले आहे. हा  सगळा परिसर कमालीचा स्वच्छ. बहुतेक काम कारसेवकांकडून चालते. सगळीकडे सतत सफाई होत असते. हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था. रात्रीही सुवर्णमंदिरात भाविकांची गर्दी. आत पवित्र तळ्याभोवती परिक्रमा मार्गावर लोक चालताहेत. मध्यभागी सुवर्णमंदिर. दिव्यांच्या प्रकाशात ते झळाळून निघाले आहे. अकाल तख्तावरही सुरेख रोशनाई. सगळीकडे शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरण. परिक्रमा मार्गावरुन एक परिक्रमा पुर्ण केली. हरमंदिर साहिबमधे सुरु असलेल्या गुरुबाणी आणि शबद किर्तनाचे सूर कानावर पडत होते. गुरु नानक, अर्जुन देव, शिरोमणी बाबा नामदेव म्हणजे आपले  नामदेव  महाराज यांनी दिलेला मानवतेचा आणि समानतेचा संदेश  कानावर पडत होता. मग पावलं लंगरकडे वळली. रांगेत सगळे ताट, पाणी पिण्यासाठी वाटी घेत होते. ताट वाटी एकदम स्वच्छ. त्या साफ करणारेही कार सेवा करताहेत आणि वाढणारेही. पंगती मागून पंगती उठत होत्या. पण कुठेही गडबड नाही. चहाचीही सोय. ताटलीतून मिळणारा चहा. पुन्हा एकदा परिक्रमा मार्गानं फिरलो. सगळीकडे गुरुबाणीचं पठन आणि सगळ्यांच्या चेह-यावर भक्तिभाव. कुठेही दर्शनासाठी पैशांची मागणी नाही की बडव्यांची दादागिरी नाही. सगळं काही शिस्तित. हरमंदिर साहिब मध्ये जाता आलं नाही. तिथ रात्री अडिचनंतर प्रवेश मिळणार होता. त्यामुळं परत फिरलो. सुवर्णमंदिरात झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टारची आठवण येणं अपरिहार्य होतं. एकेकाळी दहशतवादाच्या  आगीत होरपळलेला पंजाब आणि त्याबद्दल वाचलेलं सगळं सुवर्ण मंदिरात फिरतांना आठवत होतं. पण आता सगळं मागं पडून पंजाब पुन्हा शांततामय आयुष्य जगतोय हे पाहून समाधानही वाटतं होतं. मनात अपार समाधान साठवत सुवर्णमंदिरातून सकाळी हॉटेलवर परतलो. पुन्हा परत जायचं आहे हे स्वत:ला बजावत.

    ५ एप्रिल  सकाळचे ९

    पुन्हा घुमान गावाकडे निघालो.आज ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपणार. पंजाब सरकारचे माहिती अधिकारी तीन दिवस आमच्या सोबत आहेत. प्रवासाची आणि जेवणा-खाण्याची व्यवस्था पाहताहेत. काही अडचण आली तर आम्हाला फोन करा असं त्याचं सांगणं असतं. आणि खरचं ते मदतही करतात. घुमान गावात पोहोचलो. गाडी पुन्हा गव्हाच्या शेतातून  जात होती. आता घरी पोळी खातांना या अज्ञात शेतक-यांची आठवण नक्की येईल.

    एप्रिल ५, दुपारचे बारा

    साहित्य संमेलनात साहित्याबद्दल फारशी चर्चा झाली नसली तरी संमेलनाबद्दल आणि पंजाबच्या लोकांबद्दल चर्चा होत होती. बहुतेक पंजाबी दिलदार वाटले. घुमान गावाचं स्थानिक नाव आहे घोमन... “घुमते घुमते आते हुए बाबा नामदेवनं ये गाव बसाया इसलिए इसे घोमन कहते है,” असं एक स्थानिक सांगत होता...

    काही साहित्यप्रेमींच्या मुलाखती घेतल्या. एक कुटुंब भेटलं. मुंबईची मराठी बोलणारी एक डॉक्टर तरुणी. आता पंजाबी कुटुंबाची सुन झालेली. नवराही डॉक्टर. त्याला थोडं मराठी कळतं. तिची मुलाखत घेतली. मराठीच्या ओढीनं ते घुमानला आले होते. पंजाब आणि महाराष्ट्राचं घट्ट नातं समोर येत होतं.

     

    एप्रिल ५, संध्याकाळचे पाच

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समारोपासाठी दाखल झालेत. समारोप समारंभापूर्वी ते पत्रकारांना भेटले.साहित्य संमेलनाच्या धामधुमीतही एक घोषणा त्यांनी करुन घेतली. फडणवीसांसाठी मोठी सुरक्षा व्यवस्था होती. साधारण आपल्याकडे पंतप्रधानांना असतो तशी सुरक्षा व्यवस्था इथं मुख्यमंत्र्यांना असते. मंत्रीपदाचा अनुभव नसतांनाही फडणवीस कसा कारभार करताहेत याबद्दल पंजाबच्या पत्रकारांनाही उत्सुकता होती. पंजाबच्या पंजाबी, हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांनी साहित्य संमेलनाची जोरदार दखल घेतली होती. दररोज पानभर वृत्तांत आणि रंगित फोटो दिले जात होती, मराठी कवींची नावे पंजाबी वृत्तपत्रांमध्ये झळकत होती. मराठी पद्धतीच्या जेवणाबद्दलची आस्थेनं चौकशी केली जात होती.

    एप्रिल ५, संध्याकाळचे आठ

    मग समारोपाला नेहमीची भाषणे झाली. अध्यक्ष सदानंद मोरे फार काही बोलले नाहित. साहित्य संमेलनावर होणा-या टीकेला घुमान साहित्य संमेलनानं चोख उत्तर दिलयं असं मोरे म्हणाले. लक्षात राहिलं ते ज्ञानपीठ  विजेते काश्मिरी लेखक रहमान राही याचं भाषण. भाषेसाठी आणि  साहित्यासाठी एवढे लोक एवढया दूर जमतात हे आयुष्याच्या शेवटी का होईना पाहण्याचं भाग्य़ मला लाभलं असं राही म्हणाले. राही येणार की नाही याबद्दल शंका होती. कालच ज्येष्ठ लेखक राजन खान भेटले होते. ते राहींच्या घरी जाऊन आले होते. पुराचा  फटका राहींनाही बसला होता. “डुब नही गया तो जरुर आउंगा” असं आश्वासन राही यांनी दिलं होतं. ते अखेर आले आणि छान ह्दयाला भिडणारं बोलले. आपल्या प्रादेशिक भाषा  किती  गोड आहेत याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. सुरजितसिंह बर्नाला याचं पंजाबी मिश्रित हिंदी आणि राही यांचं काश्मिरी हिंदी. दोन्ही भाषा कानाला गोड वाटतं होत्या.

    एप्रिल ५ रात्रीचे ९

    आता संमेलन संपले. घुमानचा निरोप घेऊन परत अमृतसरकडे निघालो. गाडी शेताच्या जवळ उभी होती. शेतांमधून चालतांना सोबत चंद्र होता, चांदणं होतं आणि घुमानच्या गावक-याचं प्रेमही होतं. एवढी वर्ष घुमान कुठे आहे माहितही नव्हतं पण आता मात्र हे गाव कायम लक्षात राहिल. संत नामदेवांची ही कर्मभूमी. नामदेव महाराजांना इथं खूप मानतात. प्रत्येक जण आदरानं त्यांचा उल्लेख करतो. पुण्याहून आलेले काही शिख करुन भेटले. ते गाडीनं आले होते. रेल्वे, गाडी आणि विमान असा असा सगळ्या मार्गांनी प्रवास करत आज महाराष्ट्रातील लोक घुमानमध्ये पोहोचले. सातशे वर्षांपुर्वी नामदेव पायी चालत इथं आले होते. नामदेवांच्या कार्यानं पुन्हा सगळ्यांना एकत्र आणलं. घुमानची लस्सी आणि समोसाही लक्षात राहणारा होता कारण स्थानिकाचं प्रेम त्यात होतं....

     एप्रिल ५ रात्रीचे ११

    अमृतसरला पोहोचलो. आज खाद्य भटकंतीला बाहेर पडायचं हे ठरवलं होतं. एक रिक्षा ठरवली आणि अमृतसरी खाण्याच्या शोधात बाहेर पडलो. मॉल रोड पार करत लॉरेन्स रोडवर पोहोचलो तिथं एक प्रसिद्ध सुरजित फुड प्लाझा आणि त्याचा मालक सुरजित सिंग भेटला. तुम्हाला लगे रहो मुन्नाभाईमधलं बोमन इराणीचं पात्र आठवतं ? हिंदी चित्रपटवाले समाजाचा किती बारकाईनं अभ्यास करतात हे लक्षात आलं.. लगे रहो मुन्नाभाईमधला बोमन जसा सगळ्या सेलिब्रिटींबरोबर फोटो काढून घेतो तसचं फोटोसेशन सुरजित सिंग यांनी केलं होतं.. असे अल्बमचे अल्बम त्यांच्याकडे होते.. फिल्मस्टार्सपासून राजकारण्यांपर्यंत आणि टीव्ही पत्रकारांपासून खेळाडूंपर्यंत सगळ्यांसोबत त्यांचे फोटो होते. अनेकांची तर त्यांना नावही माहित नव्हती. पण फोटो  काढण्याचा उत्साह दांडगा होता. मुख्य म्हणजे सुरजित प्लाझा मधलं जेवण  अप्रतिम होतं. इथलं तंदुरी चिकन खातांना तंदुरी चिकनच्या नावाखाली आपली मुंबईत कशी फसवणूक होते हे जाणवत होतं. तंदुरीला अजिबात रंग लावलेला नव्हता की तेल नव्हतं... सगळं जेवण रुचकर आणि कमी तेलाचं...सुरजित सिंग यांच्या मोठयांबरोबरच्या मैत्रीच्या गप्पा आणि चवदार जेवण यामुळं मजा आली. अकरा वाजता अमृतसरमध्ये सामसूम होती. आम्हीच शेवटचे. पुन्हा येण्याचं आश्वासन देऊन बाहेर पडलो. अर्थाच निघण्यापुर्वी सुरजित सिंगांसोबत फोटोसेशन झालंच !


    जालियावाला बाग

    एप्रिल ६, सकाळचे पाच

    तयार होऊन सुवर्ण मंदिराच्या ओढीनं बाहेर पडलो. मॉल रोडवरुन राजा रणजितसिंह म्युझियमच्या मार्गानं चालत निघालो. रस्त्यावर एखादं वाहन. दुचाकीवर एखादा, कोणी सायकलवर. रामबाग गार्डन लागला. मोठे वृक्ष आणि हिरवळ अनेक जण तिथं व्यायाम करत होते. थोडं चालल्यावर रिक्षा  केली. पुन्हा छोटया छोटया गल्ल्यांमधून सुवर्ण मंदिर. सकाळ असल्यामुळं गर्दी कमी होती. मंदिराबाहेर चहा घेतला. जवळच जालियनवाला  बाग आहे. त्याच्या बाजुलाच पिझ्झा हट उभं राहिलयं. गंमतच वाटली. मग सुवर्ण मंदिरात गेलो. पुन्हा तोच अनुभव. कमालीचं मानसिक समाधान. सरळ हरमंदिर साहिबकडे पावलं वळवली. कानावर गुरुबाणी आणि शबद किर्तन आणि लाईनमधल्या सगळ्यांच्या चेह-यावर आणि मनात अपार भक्तिभाव. हरमंदिर् साहिबच्या चोहीकडे पाणि आहे. हरमंदिर साहिब तीनमजली आहे. तळमजल्यावर शबद किर्तन सुरु असतं.. पेटी, तबला आणि आणखी एखादं दुसरं वाद्य.. पण भक्तीचा दरबार उभा राहतो.. ऐकणारा आणि गाणारा दोघेही भक्तीरसात न्हाऊन निघतात.. गुरुच्या बाणीचा महिमा खरचं अपंरपार असतो.. तिथे बैठक मारली.. कितीतरी वेळ गुरुबाणी ऐकत होतो... मन काठोकाठ समाधानाने भरुन गेले... मग वरच्या मजल्यावर गेलो तिथं गुरुग्रंथसाहिबसमोर मथ्था टेकवला. भरुन पावलो. मी फारसा धार्मिक नाही पण इथं खरचं काही तरी अनुभूती मिळते. मग हरमंदिर साहिबच्या गच्चीत गेलो.  सगळीकडे पवित्र जल, समोर  अकाल तख्त आणि परिक्रमा मार्गानं चालणारे भाविक... सुर्य ढगाआड गेल्यानं वातावरणही आल्हादक... हरमंदिर साहिबमधून बाहेर पडतांना प्रसाद मिळाला. अप्रतिम  चव.

    एप्रिल सहा सकाळचे आठ

    मग पावलं पुन्हा लंगरकडं वळली. पुन्हा त्याच भक्तीमय शिस्तित लंगरमध्ये प्रसाद ग्रहण केला. रोटी, कोबी बटाटयाचा रस्ता आणि खीर.. मन तृप्त झालं. सुवर्ण मंदिराला तीन चार प्रवेशव्दारे. पण कुठेही मेटल डिटेक्टर नाही की पोलिस पहारा नाही. खाकी वर्दीतला एकही पोलिस  कुठे दिसत नाही. अर्थात सुरक्षा आहेच पण ती दिसत नाही. मला गुरुबाणी आणि शबद किर्तनाच्या सीडी एमपीथ्री घ्यायच्या होत्या. जवळच्याच मार्केटमध्येच मिळाल्या. कृपाण, कडे आणि तलवारींची दुकाने. सुवर्णमंदिराच्या प्रतिकृतीही विक्रिला. आता घरी पुन्हा एकदा गुरुबाणी ऐकतांना सुवर्ण मंदिरातल्या ह्या सुवर्ण क्षणांची आठवण येईल...

    एप्रिल ६ सकाळचे ९

    सुवर्ण मंदिरालाच लागून जालियनवाला बाग आहे. एका चिंचोळ्या गल्लीतून आपण जालियनबाला बागेत प्रवेश करतो. स्वातंत्र्यसैनिकांसमोर नतमस्तक होत काही काळ आपल्या स्वातंत्र्यविरांचं स्मरण केलं. आज अटारी-बाघा बॉर्डरवरही जायचे आहे. त्यासाठी तयारी करण्यासाठी पुन्हा हॉटेलवर परतायला निघालो. “"चलो कहा चलना है ?” एक सायकल रिक्षावाला साठीचा गृहस्थ विचारत होता. अमृतसर मध्ये अजुनही काही प्रमाणात सायकल रिक्षा आहेत. सायकल रिक्षा नागपूर आणि अमरावतीतही दिसतात. बहुतेक ठिकाणी त्या बंद  पडल्यात पण काही ठिकाणी आहेत. सायकल रिक्षात बसावं की बसू नये असा मला नेहमी प्रश्न पडतो... एक माणूस पोटासाठी आपल्याला ओढत नेते हे मनाला पटत नाही. पण आपण बसलोच नाही तर त्याला पैसेही मिळत नाहित... मग करायचे काय ? मी सायकल रिक्षात का बसत नाही हे रिक्षावाल्या सरदारजींना समजावून सांगितले..त्यानेही निराश चेह-यानं समजूतीनं मान हलवली. सायकल रिक्षावाल्यांना सरकारनं कमी व्याजानं ऑटो रिक्षा खरेदीसाठी कर्ज द्यायला हवं.. मग बॅटरीवर चालणा-या रिक्षात बसून हॉटेलवर आलो. जुन्या आणि नव्या इमारती. छोटी छोटी दुकाने. रिक्षात आणि सायकलवर जाणारे लोक. दोन-तीन मजली इमारती. बेशिस्त वाहतूक आणि आपलेच घोडे पुढे दामटणारे गाडीवाले... मध्येच जुन्या पद्धीची कमान आणि मदनलाल धिंग्राचा पुतळा.. हातात पिस्तुल घेतलेला..

     

    एप्रिल ६ दुपारचे बारा

    अमृतसरपासून १५-२० किलोमिटरवर भारत-पाकिस्तान सीमा आहे. फाळणीत होरपळलेला हा भाग. अमृतसरवरुन अटारी-बाघा बॉर्डरकडे निघालो. अटारी हे गाव भारतात तर बाघा हे गाव पाकिस्तानात. अटारीजवळ बिटिंग द रिट्रिट हा सोहळा ध्वज खाली घेतांना दररोज होतो. अमृतसर अटारी मार्गावर जागोजागी चेकपोस्ट. बीएसएफनं हा परिसर व्यापलेला. जागोजागी स्टेनगन घेतलेले कमांडे आणि त्यांची येणा-यांवर करडी नजर. लाहोर फार तर ४०-५० किलोमिटवर. सिमेकडे निघालो... कश्या पद्धतीनं आपले सैनिक सिमाचं रक्षण करतात हे पाहण्यासाठी...मध्ये पुन्हा एकदा पंजाबी लस्सी, चिकन अमृतसरी, सरसो का साग आणि मकईची रोटीचा आस्वाद...

     

    एप्रिल ६ दुपारचे तीन

    बीएसएफच्या चेकपोस्टवर गाडी उभी करुन पायीच निघालो. ब्रिटिशांनी फाळणी करतांना सीमा तयार केली आधी भारत पाक एकच होता.. सीमेपलिकडे लाहोर तर इकडे अमृतसर. या रोडने पाकमधून वाहतूकही होते. अटारीजवळ एक शेवटचे चेक पोस्ट आहे. गेट उघडले की पलिकडे पाकिस्तानचे गेट. पुर्ण सीमेवर तारांचे कुंपण. त्यात करंट सोडलेला असतो.. एकापाठोपाठ एक सुरक्षेचे कडे पार करत संध्याकाळी पाचला आपण अटारीला होणा-या बिटिंग द रिट्रिट सोहळ्यासाठी पोहोचतो. दोन्ही देशाचे ध्वज समारंभपुर्वक उतरवले जातात हा सोहळा पाहण्यासाठी दोन्ही देशांचे नागरिक उपस्थित असतात. तारांच्या कुंपनापलिकडे पाकिस्तानचे नागरिक अलीकडे भारताचे नागरिक. मध्ये थोडी मोकळी जागा. दोन्ही देशांच्या मालकीची नसलेली ही जागा नो मॅन्स लॅन्ड म्हणून ओळखली जाते..

    एप्रिल ६ संध्याकाळचे पाच

    बिटिंग द रिट्रिट सोहळ्याला सुरवात झालीय. बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी आणि जवान सलामी देताहेत. पाय उंच घेत खाड खाड चालताहेत. देशभक्तीनं भारलेल्या वातावरणात  भारत माता की जयचा जयघोष सुरु आहे.. देशभक्तीवर गाणी वाजताहेत. बिटिंग द रिट्रिट सोहळ्यात महिला अधिका-यांचाही मोठया प्रमाणावर सहभाग आहे...पलीकडेही पाकिस्तानच्या ध्वजाला मानवंदना दिली जातेय. पण पाकिस्तानी नागरिक भारताच्या तुलनेत कमी आहेत. अधुनमधुन घोषणा दिल्या जाताहेत. दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर येता आपापल्या ध्वजाला कडक सलामी देताहेत.. अखेर दोन्ही देशांचे ध्वज खाली घेण्यात आले.. त्यावेळी पाकिस्तानकडून साक्षीला होते मोठया तसबिरीत बसलेले मोहम्मद अली जिना आणि भारताकडून होते महात्मा गांधी... तरुण मोठया संख्येनं हा सोहळा पाहण्यासाठी आले होते.. सीमेनं दोन देशांची फाळणी केली असली तरी हवेत उडणारे पक्षी मात्र  थेट  कुठल्याही व्हिसाविना इकडून तिकडे जात होते...

    एप्रिल ६, संध्याकाळचे पाच...

    अटारी-वाघा बॉर्डरवरुन परत येतांना जाणवलं की घरादारापासून दूर किती अवघड परिस्थितीत जवान आपल्या सिमाचं रक्षण करतात. सीमेवर झालेल्या गोळीबाराच्या आणि घुसखोरीच्या आपण बातम्या  ऐकतो तेव्हा किती अवघड परिस्थितीमध्ये आपले जवान सीमांचं रक्षण याची कल्पनाही येत नाही.... अमृतसरच्या जालियनवाला बागेनं आपल्याला ज्यांनी  स्वातंत्र्य मिळवून दिली त्यांची आठवण करुन दिली तर अटारी-वाघा सीमेवर हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणा-या जाबांज सैनिकाचं दर्शन झालं..

    एप्रिल ६ संध्याकाळचे ९

    पुन्हा अमृतसर  स्टेशन. गोल्डन टेम्पल एक्सप्रेसनं पुन्हा मुंबईकडे प्रवास... अमृतसर स्टेशनवर फिरतांना आपण एखाद्या स्वातंत्र्यपुर्व काळातल्या चित्रपटाची दृश्य पाहतोय असं वाटतं.. जागोजागी जुन्या काळाच्या खुणा आढळतात.. पण सरकते जिने पाहून आपण पुन्हा वर्तमानात येतो.. स्टेशनवर सुरेख रोशनाई केलेली आहे...

    पंजाबचा निरोप घेत सव्वानऊ  वाजता गोल्डन टेम्पल एक्सप्रेसमध्ये बसलो आणि मुंबईकडे निघालो...

    इथेच आपलाही निरोप घेतोय...  

     

     

     

    * इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

    * झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.