कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : राज्यात येत्या फेब्रुवारीला मुंबईसह दहा महानगरपालिकांची निवडणूक होतेय. या ठिकाणी राजकीय वातावरणही चांगलंच तापायला लागलंय. पण या सर्व शहरांपेक्षा पिंपरी चिंचवड मध्ये मात्र राजकीय आखाड्यातील वस्ताद खूप आधीच निवडणुकीच्या 'दंगल' साठी सज्ज झालेत.
शहरात खरी लढाई राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये पर्यायाने अजित पवार आणि भाजपमध्ये आहे. राष्ट्रवादीची सगळी मदार अजित पवार यांच्यावरच असली तरी अजित पवार यांच्यासाठी विलास लांडे आणि आझम पानसरे या दोन वस्तादांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
पिंपरी चिंचवडच्या राजकारणाची ज्यांना ओळख आहे त्यांना विलास लांडे किती महत्वाच नाव आहे हे वेगळं सांगायला नको. विधानसभा निवडणुकीतला पराभव आणि विधानपरिषद निवडणुकीतले अयशस्वी बंड यामुळे विलास लांडे बॅकफूटला असले तरी केव्हाही फिनिक्स पक्षासारखी भरारी घेण्याचे कसब विरोधक ही मान्य करतात. म्हणूनच पिंपरी चिंचवड राजकारण त्यांना वगळून पुढे जात नाही. त्याच मुळे विलास लांडे यांची भूमिका सर्वांसाठीच चर्चेचा विषय झालीय.
गेल्या काही दिवसांपासून विलास लांडे राजकारणात पुन्हा सक्रिय झालेत. अजित पवार यांच्या बरोबर अनेक कार्यक्रमात ते दिसायला लागलेत. राजकीय अपरिर्हतेमुळं त्यांना राष्ट्रवादी सोडणे अशक्य आहे आणि आधीच धक्के बसलेल्या अजित पवार यांना ही विलास लांडे यांची गरज आहे. विलास लांडे यांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या भोसरी विधानसभा मतदार संघात महापालिकेच्या तब्बल ४६ जागा आहेत. तिथे आमदार महेश लांडगे यांनी आपली ताकत वाढवायला सुरुवात केलीय.
४६ पैकी अधिक नगरसेवक जिंकून आणून भोसरीचे सर्वेसर्वा होण्याचा महेश लांडगे यांचा प्रयत्न आहे.पण त्यांच्या या महत्वकांक्षेतला एकमेव अडसर म्हणजे विलास लांडे. सध्या जरी विलास लांडे हे महेश लांडगे यांच्या तुलनेत थोडे कुमकुवत वाटत असले तरी पिंपरी चिंचवडचे शरद पवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लांडे यांच्या डावपेचांचा मुकाबला करण्यात महेश लांडगे अजून ही कमी पडू शकतात ही वस्तूस्तिथी आहे.
त्यातच महेश लांडगे यांना रोखायचे असेल तर महापालिकेतली सत्ता सूत्रे स्वतःच्या हातात ठेवण्याशिवाय लांडेना पर्याय नाही. म्हणूनच ते सर्व राजकीय कसब पणाला लावणार यात शंका नाही. आणि राष्ट्रवादीला पर्यायाने अजित पवार यांना महापालिकेच्या 'दंगल' साठी त्यांचा हा वस्ताद पूर्ण तयारीसाठी उतरणे गरजेचे आहे.
विलास लांडे यांनी ही मुलगा विक्रांतला निवडणुकीत उतरवायचे हे फक्त चर्चेला आणले तरी भाजपला त्याचा मुकाबला कसा करायचा हे समजायला वेळ लागतोय. सध्या तरी विलास लांडे फक्त सक्रीय झाल्याने अनेकांना सहज वाटणारा विजय दूरचा वाटायला लागलाय. म्हणूनच पिंपरी चिंचवडच्या राजकीय 'दंगल' मध्ये विलास लांडे या वस्तादाची भूमिका महत्वाची ठरणार आहे...!
विलास लांडे यांच्या प्रमाणेच शहराच्या राजकारणातले दुसरे महत्वाचे नाव म्हणजे आझम पानसरे. कित्येक दिवस राजकीय विजनवासात गेलेल्या आझम पानसरे यांनी ही आपली नाराजी दूर सारत अजित पवारांच्या बरोबर इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीत हजेरी लावत सक्रिय झाल्याचे संकेत दिलेत. आझम पानसरे हे विलास लांडे यांच्या प्रमाणे 'धूर्त' राजकारणी नसले तरी पिंपरी विधानसभा मतदारसंघात त्यांची चांगलीच ताकत आहे.
अल्पसंख्याक समुदायाचा शहरातला एकमेव चेहरा, जवळ पास सर्वच झोपडपट्टीभागावर एक हाती नियंत्रण आणि समर्थकांचा मोठा पाठिंबा यामुळे सहज १५ ते २० नगरसेवक निवडून आणण्याची त्यांची ताकत आहे. आझम पानसरे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष असताना राष्ट्रवादीला दोन वेळा घवघवीत यश मिळाले होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीसाठी लकीही आहेत.
पिंपरी चिंचवडमधले सर्वाधिक जुने राजकीय व्यक्तिमत्व असून ही आमदार होऊ न शकल्याचे शल्य बोचत असल्याने गेल्या कित्येक महिन्यांपासून ते राजकीय घडामोडींपासून दूरच होते. पण आता ते सक्रिय झालेत. राजकारणापासून दूर व्हायचा प्रयत्न केला तरी विरोधक राजकीय अस्तित्वच संपवून टाकू शकतात याची पुरती जाण असलेल्या आझम पानसरे यांनी आता पुन्हा सक्रिय होत निवडणुकीच्या 'दंगल' साठी ते सज्ज असल्याचे दाखवलंय.
अजित पवार यांनाही विलास लांडे यांच्या प्रमाणेच आझम पानसरे महत्वाचे आहेत आणि त्यांची भूमिका ही...!
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच एकहाती वर्चस्व आहे. पण असे असले तरी लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्या रूपाने त्यांना मोठे तगडे आव्हान निर्माण झाले आहे. त्याचे आव्हान परतण्यासाठी अजित पवारांना विलास लांडे आणि आझम पानसरे आवश्यक आहेत. म्हणूनच निवडणुकीच्या 'दंगल' साठी अजित पवार यांचे हे 'वस्ताद' काय करतात यावर बरेच काही अवलंबून आहे.