सचिन तायडे, पब्लिक स्पिकर, sachingtayade@gmail.com
एकीकडं सैराट ने जसं बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ घालून यशाचे नव नविन ट्रेंड सेट केले आहेत. त्याचवेळी दूसरीकडं, सैराट अशा काही नव्या परंपरा काळाच्या भाळावर कोरून ठेवत आहे की ज्याची दखल येणा-या भविष्याला कित्येक दशकं घ्यावीच लागेलच. सैराटमधून नागराज मंजुळे यांनी जशी टिपीकल लव्हस्टोरीची व्याख्याच बदलवून टाकलीय त्याच प्रमाणं सौदंर्य,भाषा, प्रेम व क्रूरता यासह जाती व्यववस्थेचं एक भिषण मात्र कराल सत्य देखील उजागर केलय.
या सिनेमाच्या निर्मिती मधे सर्वात महत्वाची दिसून आलेली बाब म्हणजे या वरील सा-याच बांबीना दर्शविण्यासाठी नागराज यांनी ज्या ग्रामीण भाषेचा उपयोग अगदी जाणून बूजून केलाय ती ही ग्रामीण भाषा आजपर्यंत व्यावसायिक चित्रपट निर्मात्यांनी अशात वापरायची फार हिम्मत केलेली नव्हती. कारण, अशा कलाकृतीत प्रमाण मराठी वापरली तरच ती भाषा शुध्द ठरेल किंवा योग्य ठरेल असा काहीसा गैरसमज मागील कित्येक पिढ्यांमधे रुजला होता किंवा रुजवण्यात तरी आला होता. सैराटच्या निमित्तानं मात्र नागराज नं असा हा भाषेच्या शुद्धतेचा पोक्कळ दिखावा टराटर फा़डला आहे. हे मात्र खरं.
जगात कोणतीच भाषा प्रभावी किंवा शुद्ध-बिद्ध नसते. मुळात राजकीय सत्ता आणि धर्मसत्ता कोणत्याही संस्कृतीला जन्म देत असते हे आपण विसरू नये. पेशवे जर पुणे ऐवजी गोंदीया, बीड किंवा नागराज मंजुळे यांच्या करमाळ्याला ला वास्तव्यास राहीले असते तर आज आपण सगळेच गोंदीया, बीड किंवा करमाळ्याची मराठी भाषाच शुद्ध किंवा प्रमाणित मानली असती.
खरंतर कुठलीही भाषा छान नसते तर त्या भाषेला वापरणारे छान असतात किंवा नसतात. भाषा शुद्ध असण्यापेक्षा व्यक्तीच्या मनातील भावना शुद्ध वा चांगली असणं अधिक महत्वाचं नाहीए का..? प्रेम, माया, वात्सल्य या सारखे शब्द त्यांच्या अक्षरांपेक्षा त्यांच्यातल्या भावनेला अधिक महत्व देतात.
सैराटची भाषा ही अभिजन वर्गाची भाषा नसून इथल्या रयतेची भाषा आहे. ही भाषा शहरी जरी नसली तरी या भाषेतली अस्सल भावना शहरी वर्गाला पुर्ण समजू शकली हेही या भाषेचं यश नाहीए का? मात्र मागच्या काही पिढ्या भावनिक शुद्धतेपेक्षा व्याकरणाच्या शुध्दतेलाच अधिक महत्व देत आल्या आहेत आणि त्यामुळेच मग “न” की “ण” यातच गुरफटून राहण्यात काही पिढ्या निघून गेल्या…इथं एक लक्षात घेतलं पाहीजे की, “पाणी” मागितल्यानं तहान भागणार आहे, आणि “पानी” मागितल्यावरही तहानच भागणार आहे हे लक्षात घेतलं पाहीजे.
शब्दांची फेक योग्य आणि अचूक असेल तर अशा संवाद कौशल्यातून व्यक्तीला चारदोन फायदे मिळू शकतात मात्र निव्वळ अशा कौशल्यातून दिर्घकाळ टिकू शकेल असं काही निर्माण होईलच, हे सांगणं तसं कठीणच. बोलण्यातला बडेजावपणा हा दांभिकपणाचा दूसरा समानअर्थी शब्द होउ नये याची ज्याने त्याने काळजी घेतली पाहीजे. मुळात कुठलाही संवाद हा विसंवादाच्या धारणेचा गुलाम त्याच वेळी होत जातो ज्यावेळी व्यक्तीला स्वतःच्या जिवनात फारसं काही आशावादी दिसून येत नाही. ही अशा प्रकारची भावना तिव्रतेनं जर वाढायला लागली तर मग शरीराला लागलेल्या सवयीतून कधी स्वभावाची निर्मिती होउन जाते हे लक्षातही येत नाही, असं जर झालं तर यातून विरोधासाठी विरोध अशी अतिरेकी शब्दभावना जन्म घ्यायला मात्र लागू शकते.
शब्द शस्त्र असल्याची गंभीर जाणीव तुकोबांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सा-यांनीच आपल्याला करून दिलीय. त्यामुळे या सर्व चिंतकांनी वैयक्तीक जीवनात प्रत्येक शब्दांना अत्यंत सांभाळून आणि रोखठोक वापरलेलं दिसून येतं. “विद्रोहाची झळाळी” आणि “विद्रोहातलं निष्पापपण” ख-या अर्थानं सांभाळण्याची दानत आणि ताकत फक्त शब्दांमधेच असते.
उज्वलतेचा किंवा कुठल्याही जाज्वलतेचा आधार नेहमीच जूनं व जे वाइट आणि कुचकामी आहे ते टाकून देण्याच्या भावनेतच असतो. कुणाही व्यक्तीचे मोठेपण साजरे करायचे असल्यास आपण ते अधिक गौरांकित करण्यासाठी जर त्या व्यक्तिची इतर व्यक्तिमत्वाशी तुलना करून दिली की आपोआपच आपले काम अधिक सोपे आणि सोइस्कर होउन जाते.
परंतु नेहमीच अशा प्रकारे केली गेलेली तुलना वास्तवाचे भान अंगिकारलेली असेल असेही नाही. त्यामुळे थोडसं जपतच का होइना आपण प्रत्येक पाउल उचललं पाहीजे. व्यक्तिमत्वाला असा आकार घेउन कुणीही जन्माला येत नसतो, ठोकून ठाकूनच, तावून सुलाखूनच असा आकार प्राप्त होत असतो.
डोक्यावरील भावनांचा भार कमी करायचा असेल तर तत्पूर्वी आपल्याला जिभेवरील शब्दांचा भार कमी करावा लागतो. खूप बोलणा-याला गृहीत धरायला लागतात लोक, मग अशा वेळी त्याच्या तोंडून निघाले एखादं महान वाक्य देखील सहज घेतलं जातं. मात्र याच उलट कमी बोलणा-याच्या प्रत्येक वाक्याला काळजीपूर्वक ऐकण्याची आपोआपच सवय लावून घेतल्या जाते. मात्र कमी बोलणं म्हणजे प्रभावी बोलणं असतं असाही समज आपण करून घेउ नये. फार फार तर कमी बोलण्याचा मुलाधार त्या त्या शब्दांचं गांभिर्य निर्माण करणारा असावा.
कुठल्याही भाषेला प्रभावी बणवण्यासाठी तिच्यातल्या उच्चांरांचा किंवा इतर कुठल्याही भाषासौष्ठतेचा आपण सराव करू शकतो मात्र या सोबत आपण हेही लक्षात ठेवलं पाहीजे की जगात कुठलीही भाषा प्रभावी नसते तर व्यक्ती प्रभावी असते किंवा नसते. व्यक्तीमत्वात जर प्रभाव असेल तर निश्चितच अशा व्यक्तीच्या भाषेतही जोरदार प्रभाव निर्माण करता येऊ शकतो. मग अशा प्रसंगी मुद्दा हाच राहतो की स्वताला प्रभावी बनवण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहीजे.
मला नेहमीच वाटत आलयं..स्वताला असं प्रभावी बणवत असतांना ज्यानं त्यानं आपआपल्या गरजेनूसार आणि विशेष म्हणजे क्षमतेनुसार स्वतामधे विविध गुणांची भरती करत सुटावं. ह्याच्या त्याच्या सारखच मला व्हायचय ही अशी प्रेरणा असावी हा असा हट्ट असू नये. उधारीचं स्वप्न पाहता येतं नसतं, ना अशा स्वप्नाला वास्तवात उतरवणं इतकं सहज सोपं असतं.
या ठिकाणी ही सुद्धा बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की विसंवाद होउ नये म्हणून आपण समोरच्या व्यक्तीच्या हो मधे हो मिसळत जाणंही योग्य नसतं. जर एखादा मुद्दा आपल्याला पटला नसेल तर आपली भूमिका आपण स्पष्टपणे मांडली पाहीजे, हे नागराज करत आलाय, खरतर आपल्या कुठल्याही स्वप्नाला अस्सलतेचा आधार असणं प्रथम आवश्यक असतं.
सैराटचं दैदिप्यमान यश पाहील्यावर हे सहज लक्षात येतं की या अशा यशाच्या मागं अस्सलतेचा,ओरिज्नलीटीचा एक मजबूत सपोर्ट नागराज यांनी उभा केलाय. मुळात सैराट असो वा आधीचा त्यांचा पिस्तूल्या वा फँड्री असो या तीनही कलाकृतींकरीता त्यांनी आपल्या मनाचा आवाज ऐकण्यावर भर दिलाय, या तीनही निर्मितींच्या वेळी नागराज यांनी जे भोगलय, जे बघितलय व जे अजूनही करोडो लोकांच्या वाट्याला जीनं आलय तेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नव्हेतर तसा आग्रहच धरला आहे की मी हेच आणि हे असच दाखवेन..आणि म्हणूनच आज कुठेतरी याच अस्सलतेमुळं महाराष्ट्रातल्या करोडो माणसांना हा सिनेमा आपला सिनेमा वाटलाय, कित्येकजन कुठेतरी स्वतःला या सिनेमात शोधत आहेत…हीच ती अस्सलता आहे जीने मराठी सिनेमाच्या वर्तमानात जान टाकण्याचा प्रयत्न केला आहे.