शिवसेनेचा उशीराचा माफीनामा !

लाखोंच्या संख्येनं सुरू असलेले मराठा मोर्चे आताच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असले तरी शिवसेनेच्या विरोधात त्यांचा फारसा राग नव्हता आणि त्यामुळे इतरांना कुणाला तोटा झाला असता तरी शिवसेनेला काहीप्रमाणात का होईना फायदाच झाला असता.... मात्र 'सामना'मध्ये मराठा मोर्चाविषयी छापण्यात आलेल्या कार्टूनमुळे एकदम चित्रच पालटलं आणि शिवसेनेच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली...

Updated: Oct 3, 2016, 07:22 PM IST
शिवसेनेचा  उशीराचा माफीनामा ! title=

धनंजय शेळके, झी २४ तास, मुंबई : लाखोंच्या संख्येनं सुरू असलेले मराठा मोर्चे आताच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असले तरी शिवसेनेच्या विरोधात त्यांचा फारसा राग नव्हता आणि त्यामुळे इतरांना कुणाला तोटा झाला असता तरी शिवसेनेला काहीप्रमाणात का होईना फायदाच झाला असता.... मात्र 'सामना'मध्ये मराठा मोर्चाविषयी छापण्यात आलेल्या कार्टूनमुळे एकदम चित्रच पालटलं आणि शिवसेनेच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली...

खरंतर शिवसेनेनं किंवा सामनानं कार्टून छापून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी माफी मागितली असती तर तो विषय तिथच संपला असता आणि शिवसेनेला त्याचे फारसे चटके बसले नसते. मात्र मराठा समाजाच्या संतापाची धग दरबारी राजकारण करणाऱ्या आणि शिवसेनेचा थिंक टँक समजल्या जाणाऱ्या सुभाष देसाई आणि संजय राऊत यांना समजली नाही... उलट त्या दोघांनी दुस-या दिवशी केलेल्या वक्तव्यांमुळे आगीत तेल ओतण्याचाच प्रकार झाला. संजय राऊत यांनी माफीचा प्रश्नच येत नाही असं वक्तव्य केलं तर सुभाष देसाई यांनी लेखी निवेदन प्रसिद्ध करून माफी मागण्यास नकार दिला. त्यामुळं मराठा समाजाच्या संतापाचा उद्रेक झाला.

गरीब कष्टकरी मराठा हा पहिल्यापासून शिवसेनेचा पाठीराखा राहिलेला आहे. या प्रकरणामुळे तो प्रचंड संतापला होता. स्थानिक मराठा नेत्यांना, शाखाप्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हाप्रमुख, आमदार, मंत्री, खासदार यांच्याकडं तो संताप व्यक्त करत होता. आणि त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आणत होता. त्यातून काही ठिकाणी राजीनाम्याचे प्रकारही झाले. तर काही आमदार, खासदारांनी राजीनाम्याची धमकी दिली. या प्रकरणी माफी मागावी आणि विषय संपवावा अशी त्यांची भावना होती. तोंडावर आलेल्या नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांकडे कोणत्या तोंडाने जावे असा प्रश्न शिवसेनेच्या नेत्यांना पडला होता. त्यामुळेच हा विषय लवकर संपावा असा त्यांचा त्यांना वाटतं होत. त्यातून दिवसेंदिवस शिवसेना पक्षप्रमुखांवर दबाव वाढत होता. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊनच सहाव्या दिवशी का होईना उद्धव ठाकरे यांना नाईलाजाने माफी मागावी लागली. पक्ष प्रमुखांनी माफी मागितल्यानंतर मग नाईलाजाने का होईना 'सामना'च्या कार्यकारी संपादक संजय राऊत यांना माफी मागावी लागली. 

शिवसेनेचा स्थापनेपासूनचा इतिहास पाहिला तर काही तुरळक उदाहरणे सोडली तरी शिवसेना कधी कोणासमोर झुकली नाही. उलट प्रत्येक वेळी तिनं इतरांना झुकवलं. त्यामुळेचं या प्रकरणात माफी मागायला त्यांना जड जात होतं. तरीही उशीरा का होईना त्यांना माफी मागावीच लागली आणि शेवटी त्यांच्याच भाषेत सांगायचा झालं तर मराठा समाजच्या रोषासमोर झुकावं लागलं. नाहीतर कार्टून छापून आल्याच्या दुस-या दिवशी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं सांगणा-यांनी सहाव्या दिवशी माफी मागितलीच नसती....

dhananjay_29sep@yahoo.com