मी वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी प्रकाशन व्यवसायात पदार्पण केलं. त्यानंतर आजमितीला साठ वर्षाहून अधिक काळ मी या व्यवसायात आहे. मी सुरवात केली तेव्हाच कवी कुसुमाग्रज विशाखा काव्यसंग्रहामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर आरुढ होते. विशाखाच्या वलयामुळे कुसुमाग्रजांची प्रतिमा समाजमनात एक सुपरमॅन अशीच होती. मला स्वत:ला दहावीत असताना त्यांची कविता अभ्यासाला होती. माझा आणि त्यांचा परिचय साधारणत: १९५२ सालचा, त्यावर्षी मौजने त्यांचे कालिदासाच्या मेघदूतचे भाषांतर छापलं होतं. माझं मौज परिवारात जाणं-येणं असल्याने त्यावेळेस त्यांना प्रकाशनाकरता विचारणा करण्याचं प्रश्न नव्हता. कारण, मीही मौजचा एक भाग होतो. त्यानंतर मी १९५४ साली कुसुमाग्रजांच्या ऑथेल्लोचं भाषांतर प्रकाशित केलं. कुसुमाग्रजांचे मला १९६० साली पत्र आलं आणि नाटकाचे भाषांतर प्रकाशित कराल का अशी विचारणा त्यात होती. कुसुमाग्रजांनी माझ्यासारख्या तरुण नवोदिताला पत्र पाठवून विचारावं हे मला अचंबित करणारं होतं. पण मी महाविद्यालयात नाटकांमध्ये खूप गुंतून गेल्यामुळे त्यांनी मला विचारलं असावं. त्याकाळी नानासाहेब फाटकांसारखे दिग्गज आमच्या महाविद्यालयात नाटकं बसवायला येत असत.
त्यानंतर आमच्या प्रकाशनगृहाने कुसुमाग्रजांची जवळजवळ २२ पुस्तकं प्रकाशित केली. खरतरं विशाखानंतरचे त्यांचे काव्यसंग्रह तेवढ्या उंचीचे नव्हते, त्यामुळे मधल्या काळात त्यांनी मला काव्य संग्रहांच्या प्रकाशनाविषयी विचारलं असतं तर मी विचार केला असता. त्याचे कारण तोवर आमच्याकडे नव्या पिढीचे मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकरांचे काव्यसंग्रह प्रकाशनासाठी येऊ लागले होते. मराठीतील नामवंत समीक्षक वा.ल.कुलकर्णी एके दिवशी माझ्याकडे आले आणि त्यांनी कुसुमाग्रजांच्या नवीन काव्य लेखनाविषयी सूचविलं. कुसुमाग्रजांचे छंदोमयी आणि मुक्तायन हे काव्यसंग्रह आम्ही प्रकाशित केले ते निश्चितच ताकदीचे आणि दर्जेदार अभिजात असेच आहेत. कुसुमाग्रजांनी बदलता काळ आणि भाषेतील बदल आत्मसात केले होते.
कुसुमाग्रजांच्या घरी माझं जाणं येणं होतं. पण त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या भोवती त्यांनी एक कवच निर्माण केलं होतं आणि त्यामुळे कोणतीही व्यक्ती मी कुसुमाग्रजांना पूर्णपणे ओळखते असा दावा करु शकणार नाही. तसंच त्यांच्या पत्नी मनोरमाबाईंना मी भेटलेलो आहे, पण त्यांच्या विषयी मला गूढ आहे. मनोरमाबाई कधीच बाहेरच्या खोलीत येत नसत, त्या काही अशिक्षीत स्त्री नव्हत्या, शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. मी त्यांच्याकडे राहिलो असल्याने त्यांनी मला जेवायला वाढलं आहे, पण आमच्यात संवाद कधीच झाला नाही. मी कुसुमाग्रजांच्या सर्व भावंडांना भेटलो आहे, फक्त त्यांच्या भगिनी कुसुम यांनाच भेटलेलो नाही, त्यांना आजही भेटण्याची इच्छा आहे.
कुसुमाग्रजांनी त्याकाळी आंतरजातीय विवाह केला होता, हे माझ्याकरता विलक्षण आहे. इतकचं नव्हे तर कुसुमाग्रजांच्या भगिनी यांनी मनोरमाबाईंचे भाऊ यांच्याशी विवाह केला होता. इतके कुसुमाग्रजांचे आणि मनोरमाबाईंचे सुनावणी कुटुंब एकजीव झालं होतं.
कुसुमाग्रजांना लोकांचे आदरातिथ्य करायला मनापासून आवडत असत. त्यांना कायम कोणत्याही प्रसंगी यजमानपद भूषवायला आनंद वाटत असे. समीक्षक वा.ल.कुलकर्णींचा सत्कार नाशिकला करायचं ठरल्यानंतर आम्ही मुंबईहून बरीच मंडळी तिकडे गेलो. नाशिकमध्ये त्यानिमित्ताने एक मिनी साहित्य संमेलनच भरलं. कार्यक्रमाच्या दिवशी खर्च आणि व्यवस्थेसंबंधी कुसुमाग्रजांना विचारावं असं मला वाटत असताना ते आले आणि म्हणाले, की मी आणि वसंतराव कानेटकरांनी सर्व व्यवस्था केली आहे. नाशिकच्या कार्यक्रमाचा खर्च त्यांनी आम्हाला करु दिला नाही