कवितेच्या उगमाकडे (कहाणी कुसुमाग्रजांची- श्री. शं. सराफ)
गजानन इंग्रजी चौथीत, म्हणजे आताच्या आठवीत शिकत होता. वर्गात मराठीच्या शिक्षकांनी लोकमान्य टिळकांवर निबंध लिहावयास सांगितला. शिक्षकांना निबंध आवडल्याने त्यांनी गजाननची पाठ थोपटली. त्या नशेतच तो घरी आला. समोर नाशिकच्या साप्ताहिक ‘लोकसत्ता’चा अंक दिसला. अंकाच्या पहिल्याच पानावर एक ऑगस्टचा अंक लोक’ान् टिळक विशेषांक निघणार असल्याचा मजकूर होता. त्याच्या मनात कल्पना चमकली. त्याने लगेच एका कागदावर एका दमात टिळकांवर कविता लिहून काढली. उत्साहाच्या भरात तो कागद घेऊन सरळ घराजवळ असलेल्या ‘लोकसत्ता’ कार्यालयात गेला. डाव्या बाजूच्या भव्य दरवाजातून ‘प्रेस’चे दर्शन झाले. कवी आत शिरला, तो उजव्या बाजूस भिंतीलगत एक भव्य शिसवी टेबल दिसले. टेबलामागे टेबलाला शोभणारी खुर्ची होती. टेबलासमोर दोन खुर्च्या. सर्व फर्निचर लाकडाचे व भक्कम होते. मागच्या खुर्चीवर बदामी रंगाचा फेटा बांधलेले, उंचेपुरे वाटणारे गोरेपान गृहस्थ बसले होते. अंगात लांब कोट, कपाळावर गंध. त्या धीरगंभीर पुरुषाला पाहून कवीचे धैर्य पार गळाले. पण आता गुहेत शिरल्यावर पळ काढणे बरे नव्हते. कवी टेबलासमोरच एका खुर्ची’ागे कसाबसा उभा राहिला. तेवढ्यात काहीतरी लिहीत असलेल्या त्या गृहस्थांचे कवीकडे लक्ष गेले. या उमद्या मुलाकडे त्यांनी हसून पाहिले. कवीने हातात पकडून ठेवलेला कवितेचा कागद त्यांच्या हातात दिला. कागद समोर धरून चष्म्यातून ते मजकुरावर नजर फिरवू लागले, ही संधी साधून कवीने झपझप पावले टाकीत रस्ता गाठला. कवी घामाने अक्षरश: निथळत होता. नंतर कवीला समजले, ते सद्गृहस्थ म्हणजे ‘लोकसत्ता’चे संपादक व गावातील एक ज्येष्ठ नेते वैद्यरत्न विष्णुशास्त्री केळकर होते. एवढे विद्वान गृहस्थ आपली कविता छापणार नाहीत ही कवीला खात्री होती. एक ऑगस्ट १९२६ रोजी कवी शाळेतला टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम संपवून घरी आला. समोर मासिकाच्या आकारात छापलेला ‘लोकसत्ता’चा ‘लो. टिळक’ अंक होता. त्याने धडधडत्या अंत:करणाने कव्हर उलटले, आत पहिल्या पानावर, वेलबुट्टीत छापलेली कविता दिसली-‘लोकमान्य टिळकांस’. कवितेखाली कवीचे नाव होते. ग.रं. शिरवाडकर. कवीची पहिल्यांदाच लिहिलेली आणि छापून आलेली ही कविता. त्याला खूप आनंद झाला. मात्र या नंतर त्याच्या प्रतिभेने एक झकास ‘पॉज’ घेतला.
शाळेत इंग्रजी पाचवीच्या, म्हणजे आजच्या नववीच्या दोन तुकड्याहोत्या. दुसऱ्या तुकडीतल्या विद्यार्थ्यांनी ‘धूमधडाका’ हस्तलिखित धडाक्याने तयार
केले. तेव्हा त्यांना तडाखा देण्यासाठी गजाननच्या वर्गाने कंबर कसली. साहित्याची आवड असणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी आपले बेतलेले साहित्य ‘शिरवाडकर’च्या ताब्यात दिले. ते फारच कमी होते. मग शिरवाडकरने कथा, संवाद, नाट्यछटा, शब्दचित्र, चरित्र, निबंध सुचेल ते साहित्य लिहून काढले व अंकाला भारदस्तपणा यावा म्हणून त्या वेळच्या पाठ्यपुस्तकातील कवितांची रचनानजरेसमोर ठेवून ‘शिखरिणी’ वृत्तात ‘नारायणराव पेशव्यांचा वध’ ही दीर्घ व प‘ेदार विलापिका तयार केली आणि दुसऱ्या अंकाला तडाखा देण्याइतके बळ कमावले. कुसुमाग्रज - वि.वा. शिरवाडकरांच्या भविष्यकालीन लेखनाची बीजे येथे दिसतात.
दत्तात्रय सखाराम पुरोहित हे तात्यासाहेबांना दोन वर्षे वर्गशिक्षक होते. उंची साडेसहा फूट, शरीरयष्टी पहेलवानी, व्यक्तिमत्त्व ओबडधोबड पण करारी, तपकिरीचा भरपूर प्रसाद कपड्यांनी चाखलेला, पण वाणीवर वाक्देवतेचा वरदहस्त. इंग्रजीचे तास रंगतदार होत, तर इतिहासातील प्रसंग साक्षात डोळ्यांसमोर घडत आहेत असा विद्यार्थ्यांना भास होई. गजानन इंग्रजी सहावीत असताना ते एकदा एका गैरहजर शिक्षकांच्या तासाला वर्गात आले आणि इंग‘जी किंवा इतिहास न शिकविता कविवर्य तांब्यांची ‘हे कोण गे आई’ कविता वाचण्यास त्यांनी सुरुवात केली. ‘नदीच्या शेजारी, गडाच्या खिंडारी’ या प्रारंभीच्या चरणापासून कवितेतील अद्भुत वातावरण असे काही जिवंत केले की सारा वर्ग थरारला. शिरवाडकरच्या अंगावर रोमांच उठले आणि त्याला कवितेच्या उगमाकडे / १९ जाणवले - कविता म्हणजे एखाद्या विषयाचे पद्यरूप नव्हे तर आपल्याला अनुभवाच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाणारी ती एक अलौकिक शक्ती आहे. थोडक्यात सांगायचे तर-
वेषाने गबाळ | वाणीने मधाळ ॥