www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित अनुमती चित्रपटाचा न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्येही गौरव करण्यात आला आहे. मराठी चित्रपटाचा गौरव झाल्याने आनंद व्यक्त होत आहे.
या फेस्टिव्हलमध्ये विविध देशांतील भारतीय वंशाच्या दिग्दर्शकांचे चित्रपट दाखवण्यात आले होते. यात परीक्षकांनी `अनुमती` ला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने गौरविले. `अनुमती` ला या आधी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
फेस्टिव्हलमध्ये हंसल मेहता यांच्या `शहीद` या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला असून `लिसन अमाया` या चित्रपटातील भूमिकेसाठी दीप्ती नवल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
हा भारतीय संवेदनांचा सन्मान आहे. कुटुंब, नवरा-बायको, त्यांचे सहजीवन, प्रतिकूल परीस्थितीतही अजोड असणारे त्यांचे भावबंध या भारतीय संवेदना परदेशातील लोकांनाही आपल्याशा वाटल्या. `अनुमती` चा विषय वैश्विक असणे हेच या चित्रपटाच्या लोकप्रियतेचे गमक असल्याचेही उद्गार गजेंद्र अहिरे यांनी काढले.