www.24taas.com, मुंबई
सामाजिक विषयांवर चित्रपटाची निर्मिती करणारे दिग्दर्शक प्रकाश झांचा नवा कोरा ‘चक्रव्यूह’ सिनेमा काल बॉक्सऑफिसवर रिलीज झालाय. प्रकाश झांचा ‘चक्रव्यूह’ हा सिनेमा राजकारण आणि नक्षलवादावर आधारित आहे. नक्षलवाद आणि यंत्रणा यांच्यातील द्वंद्वात जनतेची होणारी कुचंबणा या चित्रपटात चित्रण प्रकाश झा यांनी आपल्या चक्रव्यूह चित्रपटात केलंय.
दिग्दर्शक प्रकाश झा फक्त सिनेमे बनवत नाहीत तर चित्रपट आणि चित्रपटात मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांचा प्रेक्षकांच्या मनावर सिनेमागृहातून बाहेर पडल्यानंतर तितकीच छाप पडेल यासाठी प्रयत्न करत असतात. पण हा सिनेमा सामान्य प्रेक्षकांना पचण्यासारखा नाही. तसंच कुठेतरी प्रकाश झांचा हा सिनेमा आपली छबी तयार करण्यात मागे राहिलाय. प्रकाश झांचा ‘गंगाजल’ असो किंवा ‘राजनिती’ सारखे इतर सर्व चित्रपट अनोख्या प्रकारेच आपली कहाणी सांगून जातात. पण चक्रव्यूह मधील नक्षलवाद प्रकाश झांच्या नजरेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘दामुल’ पासून ते ‘मृत्यूदंड’ पर्यत प्रकाश झांच्या वेगवेगळ्या दिग्दर्शनाचे पैलू पाहायला आजपर्यत मिळाले आहेत. या सिनेमांमध्ये नेहमीसारखा ‘मसाला’ नव्हता
‘चक्रव्यूह’ सिनेमामध्ये आदिल खान(अर्जुन रामपाल) आणि कबीर (अभय देओल) यांची कथा आहे. आदिल आणि कबीर चांगले मित्र असतात. कबीरचा स्वभाव थोडा तापट असतो. कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करायचा नाही, असा त्याचा हेका असतो. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर आदिल आणि कबीर पोलिसात भरती होतात. तापट स्वभावामुळे काही काळानंतर कबीरला पोलिस दलातूनही काढण्यात येतं. आणि या सगळ्या प्रकारातून नक्षवादाचा जन्म कसा होतो हे दाखवले आहे.
प्रकाश झांचा ‘चक्रव्यूह’ तांत्रिकदृट्या चकचकीत नाही. पण चित्रपटात ड्रामा खच्चून भरला आहे. चित्रपटात अभय देओलच्या अभिनयाला तोड नाहीय. त्याचप्रमाणे मनोज वाजपेयीने सुध्दा पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचा जबरजस्त तडका मारलाय. इतर सर्व कलाकारांनी तितकाच चांगला अभिनय केलाय.
चित्रपटाचा विषय तसा चांगला आहे आणि पाहण्यासारखा आहे. पण सिनेमामध्ये कुठल्याही प्रकारचा बॉलिवूड मसाला नाहीय. ज्या प्रेक्षकांना टिपिकल बॉलिवूड सिनेमा पाहायला आवडतो त्यांना चक्रव्यूह चित्रपट भावणार नाही. चित्रपटाचा मुद्दा गंभीर असल्याने हा चित्रपट सामाजिक समस्यांसोबत जोडल्या गेलेल्या व्यक्तींना जास्त आकर्षित करेल. एकंदरीत सामाजिक विषय असलेला ‘चक्रव्यूह’ हा सिनेमा एकदा पाहण्यासारखा आहे.